चालू घडामोडी : १५ मार्च

वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्टमध्ये भारताची पीछेहाट

  • संयुक्त राष्ट्राने तयार केलेल्या आनंदी देशांची यादीमध्ये (वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०१८) २०१७च्या क्रमवारीतही भारतापेक्षा आनंदी असणाऱ्या पाकिस्तानने २०१८मध्येही भारताला मागे टाकले आहे.
  • प्रत्येक वर्षी भारतीय जास्तीत जास्त दुखी होत असल्याचे, तर तुलनेने पाकिस्तानी जास्तीत जास्त समाधानी होत असल्याचे चित्र या अहवालातून समोर आले आहे.
  • २०१७मधील वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्टमध्ये भारताची ४ क्रमांकाने घसरण झाली होती. २०१८मध्ये मात्र भारत ११ क्रमांकांनी खाली आला आहे. १५६ देशांच्या यादीत भारत १३३व्या क्रमांकावर आहे.
  • दहशतवादाची टांगती तलावर डोक्यावर घेऊन वावरणाऱ्या पाकिस्तान मात्र ५ क्रमांकाने प्रगती करत ७५व्या स्थानी पोहोचला आहे.
  • आनंदी देशांच्या या क्रमवारीत बांगलादेश, भुतान, नेपाळ, चीन आणि श्रीलंकादेखील भारताच्या पुढे आहेत.
  • सामाजिक पाठिंबा, भ्रष्टाचारसारखे मुद्दे लक्षात घेऊन सोबतच लोकांच्या अपेक्षा यावरुन हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
  • या यादीत फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल नॉर्वे, डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झलँड, नेदरलँड, कॅनडा, न्यूझीलँड, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा नंबर लागतो.
  • अमेरिकेची या यादीत घसरण झाली आहे. गेल्या वर्षी यादीत अमेरिका १४व्या स्थानी होता. यावर्षीच्या यादीत अमेरिका १८व्या स्थानी आहे.

नील बसू स्कॉटलंड यार्ड दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख

  • जगात नावाजलेल्या स्कॉटलंड यार्ड पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून भारतीय वंशाच्या नील बसू यांची निवड झाली आहे. बसू यांचे वडील भारतीय वंशाचे आहेत.
  • या पदावर नियुक्ती झालेले बसू पहिले आशियायी व्यक्ती ठरले आहेत. २१ मार्च रोजी राजीनामा देणाऱ्या मार्क राउली यांची ते जागा घेणार आहेत.
  • ४९वर्षीय बसू सध्या मेट्रोपॉलिटन पोलिसचे उप-सहाय्यक आयुक्त आहेत. ब्रिटनमध्ये ही जबाबदारी सर्वात कठीण समजली जाते.
  • आता बसू हे दहशतवादविरोधी पथक आणि मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या विशेष मोहिमेचे प्रमुख असतील.
  • पदवीधर झाल्यानंतर बसू स्कॉटलंड यार्डच्या ‘घोस्ट स्क्वाड’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गुप्तवार्ता विभागात ते इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले.
  • पोलीस दलातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नजर ठेवून त्यांची माहिती गोळा करण्याचे अवघड काम त्यांच्यावर सोपवण्यात आले.
  • येथे आपल्या कामाची छाप पाडल्यानंतर संघटित गुन्हेगारी व गुंड टोळ्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.
  • या विभागात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना पदोन्नती मिळून ते एरिया कमांडर बनले. त्यानंतर ते दहशतवादविरोधी पथकात सामील झाले. विविध पदे त्यांनी या विभागात भूषवली.
  • आयसिसमध्ये ब्रिटनमधील काही तरुण सामील झाल्याचे संवेदनशील प्रकरणही त्यांनी कुशलतेने हाताळले होते.

हरियाणामध्येही अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा

  • अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हरियाणा विधानसभेने १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देणाऱ्या ऐतिहासिक कायद्याला मंजूरी दिली आहे.
  • मध्यप्रदेश आणि राजस्थाननंतर हरियाणा असा कायदा करणारे तिसरे राज्य ठरले आहे.
  • हरियाणात गेल्या काही काळापासून अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे हरियाणा सरकारला टीकेला सामोरे जावे लागत होते.
  • अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे.

पुणे देशातील उत्तम शासन असलेले शहर

  • विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे देशातील उत्तम शासन असलेले शहर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • या स्पर्धेमध्ये २० राज्यांमधील २३ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात पुण्याने पहिला क्रमांक मिळवला आहे.
  • ‘इंडियाज सिटी सिस्टीम फॉर २०१७’ असे या सर्वेक्षणाचे नाव असून, पुण्याने १० पैकी ५.१ गुण मिळवत इतर शहरांना मागे टाकले आहे.
  • यामध्ये दिल्लीला ४.४ तर मुंबईला ४.२ गुण मिळाले आहेत. त्यामागोमाग कलकत्ता, थिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, सुरत ही शहरे आहेत.
  • शहरातील एकूण शासकीय कामकाजाचा यामध्ये प्रामुख्याने विचार करण्यात आला होता. एकूण ८९ प्रश्नांवरुन हे गुण देण्यात आले आहेत. त्यातही कायदे, धोरणे आणि माहिती अधिकार यांचा विचार कऱण्यात आला आहे.
  • आयटीहब म्हणून ओळख असलेले बंगळुरु यामध्ये सगळ्यात खालच्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.
  • याअंतर्गत परदेशातील मेट्रो शहरांचेही सर्वेक्षण करण्यात आले आहे, त्यात दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, यूकेतील लंडन आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरांना चांगले गुण मिळाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा