चालू घडामोडी : ६ मे

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन

  • ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे ६ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते ८४ वर्षांचे होते.
  • त्यांच्या हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
  • अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवले.
  • इंदूरजवळच्या धारमध्ये कुमार गंधर्वांकडे त्यांनी गायनाला सुरुवात केली. पुढील शिक्षण त्यांनी के. महावीर यांच्याकडे घेतले.
  • त्यानंतर १९५५पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. मंगेश पाडगावकर यांची रचना आणि श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या 'शुक्रतारा मंदवारा' या गाण्याने दाते यांना लौकीक मिळवून दिला.
  • त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. १९६२ मध्ये त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली.
  • अरुण दाते यांनी २०१०पर्यंत शुक्रतारा या मराठी भावगीत कार्यक्रमाचे अडीच हजाराहून अधिक कार्यक्रम केले.
  • केवळ मराठीतच नाही तर उर्दूतही त्यांनी आपला ठसा उमटविला. मराठी-उर्दू गीतांचे त्यांचे पंधराहून अधिक अल्बम प्रसिद्ध होते.
  • भारत रत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत त्यांनी गीते गायली होती.
  • २८ वर्ष टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःला संगीत क्षेत्रात पूर्णवेळ झोकून दिले.
  • त्यांचे 'शतदा प्रेम करावे' हे आत्मचरित्रही प्रकाशित झालेले आहे.
  • शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ भावगीतगायक अरुण दाते यांना 'राम कदम कलागौरव' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना २०१०चा पहिला गजाननराव वाटवे पुरस्कारही प्राप्त झाला होता.
  • अरुण दाते यांची अजरामर भावगीते...
    • अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी
    • भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणिक राणी
    • भेट तुझी माझी स्मरते
    • या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
    • शुक्रतारा मंद वारा
    • स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
    • येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील
    • दु:ख दाटलेले उदास उदास
    • असेन मी नसेन मी
    • हे चांदणे ही चारुलता
    • देवाघरच्या फुला
    • हात तुझा हातातुन धुंद ही हवा
    • डोळ्यात सांजवेळी
    • सूर मागू तुला कसा मी
    • मान वेळावूनी धुंद बोलू नकोस
    • दिवस तुझे हे फुलायचे

नासाचे इनसाइट यान मंगळ ग्रहाकडे रवाना

  • मंगळ ग्रहावर भविष्यात प्रत्यक्ष माणसाला पाठविण्याआधी तेथील वातावरण व भूगर्भरचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने ५ मे रोजी ‘इनसाइट’ हे नवे यान रवाना केले.
  • अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने २०१२मधील ‘क्युरिऑसिटी रोव्हर’नंतर मंगळावर सोडलेले हे दुसरे यान आहे.
  • कॅलिफोर्नियातील व्हेंडेनबर्ग हवाईदल तळावरून ‘अ‍ॅटलास-५’ या अग्निबाणाच्या साह्याने ‘इनसाइट’ यानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
  • हे यान २६ नोव्हेंबरला मंगळावर उतरेल. त्यानंतर ‘रोबोटिक आर्म’ मंगळाच्या पृष्ठभागावर सेस्मोमीटर लावतील. सेस्मोमीटर हे उपकरण मंगळावरील भूकंपांचा अभ्यास करेल.
  • दुसरे उपकरण हे खोदकाम करणारे असेल. ते १० ते १६ फूट खणून ग्रहाच्या आतील वातावरणाच्या नोंदी करेल.
  • मंगळाच्या अंतर्गत स्थितीबाबत अधिकाधिक माहिती मिळवणे हा या ९९३ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्चाच्या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • तसेच मानवी मोहीमेपूर्वी मंगळावरील वातावरण आणि पृथ्वीसारख्या ग्रहांच्या निर्मितीची प्रक्रिया समजण्याचा हा प्रयत्न आहे.

न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी दीपा आंबेकर

  • न्यूयॉर्क शहरातील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी मूळच्या भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मूळ चेन्नईच्या राजा राजेश्वरी या भारतीय अमेरिकन न्यायाधीश महिलेनंतर आंबेकर या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.
  • आंबेकर यांची दिवाणी न्यायालयात नियुक्ती करण्यात आली असून, त्या फौजदारी न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहतील.
  • आंबेकर यांनी न्यूयॉर्क शहर परिषदेवर तीन वर्षे वरिष्ठ पदावर काम केले आहे. तसेच नागरी सुरक्षा समितीवर सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
  • त्यांनी त्यांचे पदवीपूर्व पदवीचे शिक्षण मिशिगन विद्यापीठातून पूर्ण केले आहे, तर रुटर्स लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आहे.

1 टिप्पणी: