चालू घडामोडी : १७ मे

सुप्रसिध्द वारली चित्रकार जिव्या सोमा मशे यांचे निधन

  • वारली चित्रशैलीला आधुनिक कलेत मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या जिव्या सोमा मशे यांचे १५ मे रोजी वयाच्या ८४व्या निधन झाले.
  • ठाणे जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या गंजाड या गावातून भास्कर कुलकर्णी यांनी जिव्या मशे हा हिरा शोधला आणि दुर्गम पाड्यांच्या भिंतीवर खितपत पडलेल्या वारली चित्रशैलीला जगाचा कॅनव्हास उपलब्ध करून दिला.
  • सुवासिनींनीच वारली चित्र काढण्याची आदिवासी प्रथा जिव्या मशे यांनी वयाच्या तेराव्या वर्षी मोडली आणि भिंतींवरील ही पारंपरिक सजावट त्यांनी कॅनव्हासवर आणली.
  • आदिवासींच्या आयुष्यातले विविध प्रसंग आणि निसर्गाला कॅनव्हासवर उतरवताना त्यांनी पारंपरिक वारली चित्र संस्कृतीला नाविन्याची जोड दिली.
  • इंदिरा गांधी यांनी देशभरातल्या पारंपरिक कलांचा शोध घेण्यासाठी १९७५मध्ये एक विशेष मोहीम राबवली.
  • आदिवासींची कला जगासमोर यावी, त्यांनी बनविलेल्या कलात्मक वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, हा त्यामागचा हेतू होता.
  • दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरलेल्या या प्रदर्शनामध्ये मशेंनी काढलेल्या वारली चित्रांचे खूप कौतुक झाले आणि ही कला लोकप्रिय व्हायला सुरूवात झाली.
  • मुंबईतल्या प्रथितयश अशा जहांगीर कला दालनात १९७५साली त्यांच्या वारली चित्रांचे प्रदर्शन भरले.
  • त्यानंतर अमेरिका, इंग्लंड, रशिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, जपान आणि चीन आदी अनेक देशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने पार पडली.
  • वारली कलेचा प्रसार व्हावा म्हणून राज्य शासनाच्या वतीने मशेंनी ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांद्वारे अनेक होतकरू चित्रकारांना त्यांनी वारली चित्रकलेचे धडे दिले.
  • १९७६साली भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्कार देऊन मशेंचा गौरव केला. २००२साली वस्त्र मंत्रालयातर्फे ‘शिल्प गुरू’ हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
  • २०११मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले ते पहिले आदिवासी कलावंत आहेत.
  • बेल्जियमच्या राणीने मशे यांना १७ लाख रुपयांची बक्षिसीही दिली होती, तर जपानच्या मिथिला म्युझियमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्तेही मशेंचा गौरव करण्यात आला होता.
  • निसर्ग आणि मानवी जीवन प्रतिबिंबित करणारी हि वारली चित्रकला जिव्या सोमा मशेंमुळे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख झाली.

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नवा रेल्वेमार्ग

  • त्रिपुराची राजधानी आगरतळा आणि बांगलादेशातील अखुरा हे गाव आता रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे. टेक्समाको रेल या कंपनीला २०० कोटी रुपयांचे हे कंत्राट मिळाले आहे.
  • बांगलादेशातील चितगाँव जिल्ह्यातील अखुरा गाव आणि भारतातील त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा यांच्यामध्ये ४५ किमीचे अंतर आहे.
  • या मार्गासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पाची पूर्तता करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
  • हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ त्रिपुरा आणि बांगलादेश यांच्यासाठी सेवा सुरु होणार नसून कोलकाता आणि आगरतळा यांच्यामधील प्रवासाचे अंतरही कमी होणार आहे.
  • त्याचप्रमाणे भारताचा चितगाँव बंदरापर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे. त्यामुळे भारत व बांगलादेश यांच्यामधील द्वीपक्षीय संबंध आणि व्यापार सुधारण्यासाठी या मार्गाचा फायदा दोन्ही देशांना होणार आहे.
  • याबरोबरच भारतीय रेल्वेने येत्या दोन वर्षांमध्ये ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये रेल्वेची सुविधा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  • सुमारे ९० हजार कोटी रुपये खर्च करुन ईशान्य भारतातील रेल्वेसेवेचे जाळे अधिक दृढ चांगले बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
  • यामध्ये अरुणाचल प्रदेशातील ७९५ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचाही समावेश आहे. यामुळे चीनच्या सीमेपर्यंत भारतीय नागरिकांना आणि लष्कराला वाहतूक करणे सोपे जाणार आहे.
  • तसेच बोगीबील हा अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा ब्रह्मपुत्रेवरील पूल लवकरच खुला होणार आहे. या पुलामुळेही रेल्वेला अरुणाचल प्रदेशात सेवा देणे सोपे जाणार आहे.
  • याशिवाय उडान योजनेअंतर्गत सिक्किममध्ये पाक्योंग येथे विमानतळही बांधण्यात आले आहे. हे विमानतळ भारतातील १००वे विमानतळ ठरले आहे.

झिम्बाब्वेच्या हंगामी प्रशिक्षकपदी लालचंद राजपूत

  • भारतीय संघाचे माजी खेळाडू लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेच्या हंगामी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
  • जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान-झिम्बाब्वे तिरंगी मालिकेपासून राजपूत आपल्या पदाचा कार्यभार स्विकारतील.
  • हिथ स्ट्रिक यांच्या राजीनाम्यानंतर राजपूत यांच्या हातात संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्र देण्यात येणार आहे.
  • २००७च्या पहिल्या टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे लालचंद राजपूत व्यवस्थापक होते.
  • त्यांनी अफगाणिस्तान संघालाही प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तानच्या संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला होता.
  • भारतीय संघाकडून लालचंद राजपूत यांनी २ कसोटी सामने आणि ४ वन-डे सामने खेळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा