चालू घडामोडी : १६ नोव्हेंबर

दिल्लीमध्ये बीएस-VI दर्जाच्या इंधनाची विक्री

 • दिल्ली आणि एनसीआरमधील प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या इंधनाची विक्री करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे.
 • या निर्णयामुळे एप्रिल २०१८पासून दिल्लीमध्ये सध्याच्या बीएस-IV ऐवजी बीएस-VI दर्जाच्या पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जाईल.
 • दिल्लीत गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. धुरक्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाचे संकट दिवसागणिक गंभीर होत आहे.
 • दिल्लीत बीएस-VI दर्जाच्या पेट्रोल, डिझेलची विक्री १ एप्रिल २०२० पासून केली जाणार होती.
 • मात्र, प्रदूषणामुळे दिल्लीची अवस्था अतिशय गंभीर झाल्याने दोन वर्षे आधीच बीएस-VI दर्जाच्या इंधनाची विक्री सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • सध्या दिल्लीमध्ये बीएस-IV दर्जाच्या इंधनाची विक्री होते. यानंतर बीएस-V दर्जाचे इंधन दिल्लीतील पेट्रोल पंपांवर विक्रीसाठी उपलब्ध होणार होते.
 • मात्र, प्रदूषणाची समस्या बिकट झाल्याने थेट बीएस-VI दर्जाच्या इंधनाची विक्री करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला.
 • पेट्रोलियम मंत्रालयाच्या या निर्णयामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यास आणि पर्यायाने प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

एमएसडी स्थापनेसाठी कार्यकारी समिती

 • दिल्लीतील प्रख्यात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ (एमएसडी) सुरु करण्यासाठी राज्य सरकारने कार्यकारी समितीची स्थापना केली आहे.
 • देशभरातील रंगकर्मींची पंढरी म्हणून ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ला ओळखले जाते.
 • महाराष्ट्रातील तरूण रंगकर्मींना नाटकांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी आणि रंगभूमीविषयक नव्या संकल्पना आणि प्रयोगांना वाव मिळावा यासाठी ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ सुरु करण्यात येणार आहे.
 • एमएसडीमध्ये मराठी लोककला व लोकनाट्याचा अभ्यास करता येईल. रंगभूमीच्या सर्वांगिण विकासाला वाहिलेले हे संकुल असेल.
 • दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष असतील, तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीतील सदस्य असतील.
 • आगामी सहा महिन्यांमध्ये अभ्यासगट राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.

रॉजर फेडरर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

 • फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार, गोल्फपटू टायगर वुड्सला मागे टाकत रॉजर फेडरर वैयक्तिक क्रीडा प्रकारात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे.
 • रॉजर फेडररने आतापर्यंत बक्षिसांच्या माध्यमातून ११ कोटी २ लाख ३५ हजार ६८२ अमेरिकी डॉलर्सची कमाई केली आहे.
 • फेडररने टायगर वुड्सच्या ११ कोटी ६१ हजार अमेरिकी डॉलर्स या कमाईला मागे टाकत सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू हा मान मिळवला.
 • जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या फेडररच्या खात्यात यावर्षीच्या ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन या दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांची विजेतेपदे जमा आहेत.