नरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  Narendra Modi & Shekh Haseena at airport
 • भारताचा परंपरागत मित्र व शेजारी देश असलेल्या बांगलादेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर ६ जूनला रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये दाखल झाले. त्यांची बांगलादेशला ही पहिलीच भेट असून दोन्ही देशांतील संबंधांना नवीन आयाम देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मोदी यांचे हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी स्वागत केले. त्यांच्यासमवेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील आहेत.
 • मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि बांगलादेशात द्विपक्षीय व्यापार, जलवाहतूक, मानवी तस्करी आणि बनावट नोटांच्या प्रसाराला प्रतिंबधांसह २२ करार झाले. भारताने बांगलादेशला २ अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचाही करार केला आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरनेही तीन अब्ज डॉलर गुंतवणुकीतून तेथे ३००० मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्पाचा करार केला आहे.
या दौऱ्यातील महत्वाच्या घडामोडी
 • पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दौऱ्याची सुरवात १९७१च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना आदरांजली वाहून केली. याशिवाय मोदींनी स्मारक परिसरात मॅग्नोरिया फूलाचे रोपटे लावले. 'उदय पद्म' असे या रोपट्याला नाव देण्यात आले आहे.
 • त्यानंतर मोदींनी ढाका येथील बंगबंधु म्युझियमला भेट दिली. बांगलादेशाचे पहिले राष्ट्रपती आणि विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर्रहमान यांना श्रद्धांजली अर्पण केली. याच ठिकाणी शेख मुजीबुर्रहमान यांची हत्या झाली होती. बांगलादेशात त्यांना राष्ट्रपिताचा दर्जा प्राप्त झाला आहे. बांगलादेशाच्या उभारणीत मुजीबुर्रहमान यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
भारत-बांगलादेशात सीमा करार
 • मोदींच्या बांगलादेश दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भारत-बांगलादेश दरम्यान गेली ४१ वर्षे सुरू असलेला जमीन सीमा वाद या ऐतिहासिक करारानंतर संपुष्टात आला. या करारामुळे दोन्ही देश काही भूभाग एकमेकांना हस्तांतरित करणार आहे. 
 • त्याबाबतच्या कराराची कागदपत्रे दोन्ही देशांनी एकमेकांना हस्तांतरित केली असून १९७४ च्या भारत-बांगलादेश कराराची अंमलबजावणी आता सुरू होत आहे. सीमावाद संपविण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांनी हा करार केला होता.
 • या करारास संसदेने गेल्याच महिन्यात मंजुरी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
 • या करारानुसार बांगलादेश भारताला ५१ वसाहती हस्तांतरित करणार आहे तर भारत बांगलादेशला १११ वसाहती हस्तांतरित करणार आहे. भारत बांगलादेशला १० हजार एकर जमीन देणार आहे तर भारताला ५०० एकर जमीन मिळणार आहे. 
 • भारत व बांगलादेश दरम्यान ४०९६ कि.मी.ची सीमा असून, तेथून दहशतवाद्यांना बांगलादेशात जाण्यास मदत मिळत असते. त्याला या करारामुळे आळा बसणार आहे. तसेच सुमारे ५० हजार रहिवाशांच्या नागरिकत्वाचा प्रश्नही सुटणार आहे.
दोन नवीन बससेवा सुरू
 • मोदींनी ६ जूनला कोलकाता-ढाका-आगरतळा आणि ढाका-शिलाँग-गुवाहाटी या दोन बससेवा सुरू केल्या. आधी कोलकात्याहून आगरतळ्याला जाण्यासाठी १६५० किमी अंतर पडत होते. आता ढाका मार्गे गेल्याने ते ५६० किमीने कमी होणार आहे. 
 • या मार्गावर पश्चिम बंगाल सरकारची एक आणि त्रिपुरा सरकारची एक अशा दोन बसेस चालतील. ढाका-शिलाँग-गुवाहाटी मार्गावर एकच बस असेल व ती बांगलादेश सरकारची असेल. सध्या ढाका-कोलकाता आणि ढाका-आगरतळा अशा वेगवेगळ्या बसेस सुरू आहेत.
 • भारत व बांगलादेश रेल्वे सेवा सुरू करण्यास इच्छुक आहे. त्यासाठी १९६५ मध्ये असलेले रेल्वे मार्ग परत सुरू करावे लागतील. आता भारताची जहाजे बांगलादेश मार्गे सिंगापूरला जाऊ शकतील असा करार करण्यात येत आहे.
ढाकेश्वरी देवी मंदिरात दर्शन
 • बांगलादेश दौऱ्याच्या दुसऱ्या व अखेरच्या दिवशी मोदींनी सकाळी सुमारे ८०० वर्षांचा इतिहास असलेल्या ढाकेश्वरी देवी मंदिरात जाऊन पूजा केली. मंदिरातील पुजेनंतर मंदिर प्रशासनाकडून मोदींचा सन्मान करण्यात आला. मोदींनी रामकृष्ण मिशन आश्रमालाही भेट दिली. यावेळी येथे उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांची त्यांनी भेट घेतली.
वाजपेयींच्या वतीने स्विकारला सन्मान
  Modi recieve award on behalf of Atal bihari Vajpeyi
 • त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्यावतीने ‘फ्रेंडस ऑफ बांगलादेश लिब्रेशन वॉर अवॉर्ड' (बांगलादेश मुक्ती संग्राम पुरस्कार) स्वीकारला. 
 • १९७१ साली झालेल्या युद्धात वाजपेयींनी दिलेल्या सहकार्याबद्दल बांगलादेशने त्यांचा गौरव केला. वाजपेयींची प्रकृती ठीक नसल्याने मोदींनी वाजपेयींच्या वतीने पुरस्कार स्विकारला. 
 • अटलबिहारी वाजपेयी यांनी खासदार असताना बांगलादेश निर्मितीला पाठिंबा दिला होता. बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद यांनी हा पुरस्कार बंगभवन येथे एका शानदार समारंभात मोदी यांना प्रदान केला.
शेख हसिनांकडून मोदींच्या आईस साडी भेट
 • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना मोदींनी आंध्र प्रदेशमधील वेंकटगिरीचे वैशिष्ट्य असलेले हातमागावर विणलेले कापड भेट दिले. 
 • तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आईसाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी खास जामदानी साडी भेट दिली आहे. 
 • जामदानी साडी ही हाताने तयार केली जाते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणवर परिश्रम तसेच वेळही खर्ची जातो. साडी तयार करताना एक खास प्रकारची नक्षी कोरली जाते. जामदानी साडीला भारत आणि बांगलादेशात एक खास दर्जा आहे. अगदी अंगठीतून आरपार जाईल एवढी पातळ ही साडी असते. आधी केवळ पुरुष या साड्या तयार करायचे. पण आता बांगलादेशात महिलाही या व्यवसायात आहेत. बऱ्याचदा ही एक साडी तयार करण्यासाठी दोन दोन वर्षांचा कालावधीही लागतो. ढाक्याच्या जामदानी साड्या चांगल्याच महागड्या असतात.
चितगाव बंदरात प्रवेशास परवानगीने भारताचा चीनच्या डावपेचांना शह
 • बांगलादेश व भारत यांच्यात चितगाव व मोंगला ही बंदरे भारतीय मालवाहतूक जहाजांसाठी खुली करण्याचा करार झाला असून, त्यामुळे चीनच्या ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ला धक्का बसणार आहे, कारण या कराराचे दूरगामी राजनैतिक परिणाम होऊ शकतात
 • चितगाव बंदर हे चीनने विकसित केले असून ते स्ट्रिंग ऑफ पर्ल्सचा भाग आहे. चीनच्या दृष्टीने ते व्यापारी बंदर असून त्याचा सामरिक व व्यापारी असा दोन्ही वापर करता येऊ शकतो. कॉक्स बझार जिल्हय़ात चीन आणखी एक  बंदर बांधत असून त्याचे नाव सोनाडिया असे आहे. 
 • भारतासाठी या बंदरात प्रवेश मिळणे ही खूप मोठी बाब मानली जाते. आर्थिकदृष्टय़ा या बंदरातील वाहतूक भारताला लाभदायी ठरणार आहे. या करारामुळे बांगलादेशवर भारताचा विश्वास वाढला आहे.
 • स्ट्रिंग ऑफ पर्ल्स : हा एक भूराजकीय सिद्धान्त आहे. त्यात चीनच्या हिंदी महासागरातील क्षमतेचा संबंध येतो. चीनचे लष्कर व व्यापार याला सोयीची अशी ठिकाणो यात आहेत. त्यात मलाक्का, मानदेब, होरमुझ व लोंबोक या सामुद्रधुनींचा यांचा समावेश होतो. बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव व सोमालिया हे देश त्यासाठी चीनला महत्त्वाचे आहेत.
इतर महत्वाच्या घटना
 • मोदी यांनी भारताकडून बांगलादेशला दिल्या जाणाऱ्या विजेत दोन वर्षांत ५०० मेगावॉटवरून ११०० मेगावॉटपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. नेपाळ व भूतानमधील व्यापारासाठी आता बांगलादेश भारतीय प्रदेशाचा वापर करू शकणार आहे. 
 • तिस्ता करार होणार असल्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली असून त्यात राजकीय प्रक्रियेचा अवलंब केला जाईल. जमीन सीमा करारात जे राजकीय शहाणपण दाखवले तेच या करारातही दाखवावे लागणार आहे. तिस्ता व फेनी या नद्यांचा पाणीवाटपाबाबत लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. 
 • सिल्हेट व खुलना येथे भारत तर गुवाहाटी येथे बांगलादेश वाणिज्य दूतावास सुरू करणार आहे. दोन्ही तटरक्षक सुरक्षेबाबत सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यामुळे मानवी तस्करी व  खोटय़ा परकीय चलनास आळा बसणार आहे. बांगलादेशने प्रथमच भारताला विशेष आर्थिक क्षेत्र सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.
 • त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगबंधू इंटरनॅशनल कनव्हेंशन सेंटरमध्ये भारतीयांना संबोधित केले. दोन्ही देशातील तरुण पिढी ही आपली जमेची बाजू आहे. बांगलादेशने गेल्या काही वर्षांत सर्व स्तरांत स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. विकासाच्या मुद्द्यावर भारत नेहमी बांगलादेशच्या पाठीशी उभा राहिल, असे मोदी यावेळी म्हणाले. 
 • बांगलादेशातील सर्व महत्त्वाच्या पदांवर महिला नेतृत्त्व करत असल्याचे पाहून अभिमान वाटत असल्याचे सांगत देशातील महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद असल्याचे मोदींनी सांगितले. भारत व बांगलादेशदरम्यान झालेल्या २२ करारामुळे जगातील विकासाचा पाया मजबूत होईल असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केला. 
 • दहशतवादाच्या समस्येवर देखील मोदींनी भाष्य केले. दहशतवादाच्या मुद्यावर स्वत:ला झीरो टॉलरेंस देश घोषित करण्याचा संकल्प करणाऱ्या बांगलादेशचे कौतुक करायला हवे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून या विरोधात सर्व देशांनी एकत्र लढले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

२ टिप्पण्या: