चालू घडामोडी - २८ जुलै २०१५

२८ जुलै : जागतिक हिपॅटायटीस दिन

राम सेवक शर्मा यांची ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती

  RS Sharma
 • राम सेवक शर्मा यांची २७ जुलै २०१५ रोजी ‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’च्या (ट्राय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मे २०१५ मध्ये निवृत्त झालेले राहुल खुल्लर यांची ते जागा घेतील.
 • राम सेवक शर्मा १९७८च्या बॅचचे झारखंड कॅडेरचे आयएएस अधिकारी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून सप्टेंबर २०१५मध्ये शर्मा निवृत्त होत आहेत.
 • त्यांनी यापूर्वी झारखंड सरकारचे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.
 • त्यांनी आयआयटी कानपूरमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून कॅलिफोर्निया विद्यापीठातून (यूएसए) मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स पदवी प्राप्त केली आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)
  Telecom Regulatory Authority in India
 • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India TRAI) हे भारतातील दूरसंचार क्षेत्रावर नियंत्रणास्तव भारत सरकार द्वारा स्थापित स्वतंत्र संस्था आहे.
 • १९९७ मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिनियम १९९७ अन्वये ट्रायची स्थापना करण्यात आली.
 • मुख्यालय - नवी दिल्ली 

‘एफएसएसएआय’च्या अध्यक्षपदी आशिष बहुगुणा

 • आशिष बहुगुणा यांची भारतीय ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’च्या अध्यक्षपदी (Food Safety and Standards Authority : FSSAI) जुलै २०१५मध्ये नियुक्ती करण्यात आली.
 • त्याची कारकीर्द तीन वर्षाची असेल आणि जानेवारी २०१५ मध्ये निवृत्त झालेले के. चंद्रमौली यांची ते जागा घेतील. जानेवारी २०१५ पासून हे पद रिक्त होते आणि आरोग्य विभागाचे सचिव भानू प्रताप शर्मा यांच्यावर ‘एफएसएसएआय’च्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. 
 • बहुगुणा राजस्थान कॅडेरचे एक १९७८च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. ते फेब्रुवारी २०१५मध्ये कृषी मंत्रालयाच्या सचिव पदावरुन निवृत्त झाले आहेत. 
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण
  Food Safety and Standards Authority
 • ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ची (Food Safety and Standards Authority : FSSAI) स्थापना ऑगस्ट २०११मध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अन्वये करण्यात आली. या कायद्यामध्ये विविध मंत्रालयांद्वारे अन्न विषयक मुद्दे हाताळण्यासाठी  केलेल्या विविध कायदे व आदेशांना अंतर्भूत केले आहे.
 • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे ‘एफएसएसएआय’ची अंमलबजावणी केली जाते.
 • मुख्यालय : नवी दिल्ली

दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वाती मलिवाल

 • दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वाती मलिवाल यांनी २८ जुलै रोजी स्वीकारला. मलिवाल यांच्या नियुक्तीला दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग यांनी परवानगी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मलिवाल यांच्यासह इतर तीन सदस्यांनीही पदाची सूत्रे स्वीकारली.
 • सूत्रे स्वीकारल्यानंतर मलिवाल आणि आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली.
 • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मलिवाल यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या नियुक्तीला नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आक्षेप घेतला होता. केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा राज्यपालांना याबाबत विनंती केली होती. नायब राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतरच आपण पदाची सूत्रे स्वीकारू, अशी घोषणा मलिवाल यांनी केली होती.

सुवर्ण चषक फुटबॉल स्पर्धा : मेक्सिकोचे विक्रमी जेतेपद

  Mexico won Gold cup
 • मेक्सिको संघाने सातव्यांदा सुवर्ण चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मेक्सिकोने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जमैका संघाचा ३-१ असा पराभव केला.
 • उत्तर व दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत जमैकाच्या रूपाने पहिल्यांदाच कॅरेबियन संघाने अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम गाजवला, परंतु त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली.
 • ३१व्या मिनिटाला कर्णधार अँड्रेस गुआर्डाडोने गोल करून मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ ४७व्या मिनिटाला जिसस कोरोना आणि ६१व्या मिनिटाला ऑरिबे पेराल्टाने गोल करून ती आघाडी ३-० अशी भक्कम केली. 
 • जमैकाकडून ८०व्या मिनिटाला डॅरेन मॅटॉक्सने एकमेव गोल केला. अखेरीस मेक्सिकोने ३-१ अशा फरकाने जेतेपद पटकावले.

ख्रिस फ्रूम टूर दी फ्रान्स स्पर्धेचा विजेता

  Chris Froom
 • ब्रिटनच्या ख्रिस फ्रूमने टूर दी फ्रान्स या नावाजलेल्या सायकल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. गेल्या तीन वर्षांतील त्याचे हे दुसरे, तर त्याचा संघ स्काय यांचे गेल्या चार वर्षांतील तिसरे जेतेपद आहे. याआधी २०१२मध्ये ब्रॅडली विग्गींन्सने, तर २०१३मध्ये फ्रूमने स्काय संघाला जेतेपद पटकावून दिले होते.
 • फ्रूमच्या या विजयाने त्याला टूर दी फ्रान्स शर्यतीत दबदबा निर्माण करणारा नवा नायक अशी ओळख मिळवून दिली आहे. २०११मध्ये टूर ऑफ स्पेन शर्यतीत दुसरे स्थान पटकावल्यानंतर फ्रूम प्रसिद्धी झोकात आला होता.
‘टूर दी फ्रान्स’ स्पर्धेबद्दल...
  Tour de France
 • १९०३ सालापासून चालू असलेली ही युरोपातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध सायकल शर्यत आहे. 
 • दरवर्षी जुलै महिन्यात साधारण ३ आठवडे चालणाऱ्या ह्या शर्यतीदरम्यान सायकलपटू सुमारे ३,६०० किमी अंतर पूर्ण करतात. ह्या अंतराचा मोठा हिस्सा फ्रान्स देशामध्ये काटला जातो.
 • ह्या शर्यतीच्या इतिहासामध्ये मार्गामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत पण शर्यतीचा शेवट पॅरिसमधील शाँज-एलिजे ह्या रस्त्यावर होतो.
 • ही शर्यत अमेरिकेच्या लान्स आर्मस्ट्राँगने विक्रमी ७ वेळा जिंकली आहे. परंतु नंतर त्याच्यावरील डोपिंगच्या आरोपामुळे त्याची सर्व विजेतेपदे काढून घेण्यात आली व त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली.

बांग्लादेशातील सुंदरबनात फक्त १०६ वाघ

 • बांग्लादेशातील सुंदरबनात फक्त १०६ वाघ उरले आहेत. जगातील हे सर्वांत मोठे खारफुटीचे जंगल (६०१७ चौ.किमी) आहे.
 • २००४ मध्ये वाघांची संख्या ४४० होती; पण चोरट्या शिकारीमुळे वाघांची संख्या घटल्याचे भारत-बांगलादेशाच्या संयुक्त पाहणीत आढळले.
 • बांगलादेश सरकारने २००४ मध्ये केलेल्या गणनेत सुंदरबनात ४४० वाघ आढळले होते. मात्र त्या वेळी ठशांवरून वाघांची मोजणी करण्यात आली होती. 
 • यंदा भारत-बांगलादेश संयुक्त व्याघ्रगणनेचा प्रकल्प राबविला गेला. कॅमेऱ्यांद्वारे काढलेल्या सुंदरबनातील १५००पेक्षा जास्त छायाचित्रांचा व ठशांचा यात अभ्यास करण्यात आल्यावर ही माहिती उपलब्ध झाली.
 • सन १९०० मध्ये एक लाख असलेली जगभरातील वाघांची संख्या आता ३२००वर आल्याबद्दल विश्वप्रकृती निधीने (WWF- World Wildlife Fund) चिंता व्यक्त केली आहे.

नेपाळमध्ये गधीमाई उत्सवादरम्यान होणाऱ्या पशू हत्येवर बंदी

 • नेपाळमध्ये गधीमाई उत्सवादरम्यान होणाऱ्या पशू हत्येवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गढीमाई मंदिराच्या ट्रस्टेनेच ही बंदी घातली आहे.
 • गढीमाई उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात बैल, बकऱ्या, कोंबड्या, म्हशी इत्यादी प्राण्यांची हत्या केली जात होती. दर पाच वर्षांनी हा उत्सव साजरा केला जात होता. जगातील सर्वांत मोठ्या प्रमाणात या उत्सवात पशूंची हत्या होत होती.
 • जगात सर्वात जास्त पशूबळी नेपाळच्या गढीमाई मंदिरातील जत्रेच्या काळात जातात. गढीमाई मंदिरात पुढील पूजा २०१९ मध्ये होणार आहे. या जत्रेसाठी येताना भाविकांनी प्राणी आणू नयेत असे आवाहन मंदिराच्यावतीने करण्यात आले आहे.
 • भारतासह अनेक देशांनी ही पद्धत बंद करावी यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने नेपाळ सरकारला पशूबळी थांबवण्याचे आवाहन केले होते. अखेर या आवाहनाला प्रतिसाद देत गढीमाई मंदिराच्या ट्रस्टने पशूबळींवर बंदी घातली आहे.
 • भारतात सुप्रीम कोर्टाने एका सुनावणीदरम्यान गढीमाई मंदिरातील पशुबळींवर बंदी घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच भारतातून गढीमाई मंदिरात जाणाऱ्या पशूंवर बंदी घातली होती.

सीरियामध्ये बंडखोरांच्या फौजेचा मोठा हल्ला

 • वायव्य सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बाशर अल असद यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या किनारी भागाच्या नियंत्रणासाठी बंडखोरांच्या फौजेने मोठा हल्ला चढविला. हा हल्ला फार मोठा व प्रभावी असल्याचे सीरियन लष्कराने म्हटले आहे. 
 • सहल अल-घाब या भागामध्ये घुसण्यासाठी बंडखोरांची फौज प्रयत्नशील आहे. असद यांच्या अलवाईट पंथाच्या नागरिकांची मोठी लोकसंख्या असलेला हा भाग आहे.
 • या भागामधील एक वीजप्रकल्पासहित एकूण १६ महत्त्वाची ठिकाणे बंडखोरांनी ताब्यात घेतली आहेत. बंडखोरांच्या सैन्यामध्ये अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या अल नुस्रा फ्रंटचे दहशतवादीही आहेत.
 • या व्यूहात्मकदृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या प्रांताच्या नियंत्रणासाठी सुरु झालेली ही लढाई असद यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

लीबियन हुकूमशहा गद्दाफी याच्या पुत्रास फाशी

 • लीबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मर गद्दाफी याचा मुलगा असलेल्या सैफ अल इस्लाम व इतर आठ जणांना युद्ध गुन्ह्यांसदर्भातील खटल्याच्या सुनावणीनंतर तेथील न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. सैफ अल इस्लाम हा यावेळी न्यायालयमध्ये उपस्थित नव्हता. 
 • गद्दाफी याची राजवट उलथवून लावण्यासाठी लीबियात २०११ मध्ये झालेल्या उठावादरम्यान युद्धगुन्हे केल्याचा; तसेच उठाव दडपून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात ठेवण्यात आला होता.
 • लीबियामधील झिंतान शहरामध्ये कारवाया करत असलेल्या एका बंडखोर गटाने सैफ अल इस्लाम याला २०११ पासून कैदेत ठेवले असून त्याची मुक्तता करण्यास नकार दिला आहे. ट्रिपोलीमधील सरकारला या गटाचा विरोध आहे. 
 • लीबियामध्ये सध्या सत्तासंघर्ष सुरु असून टोब्रुक व ट्रिपोली अश दोन शहरांमध्ये दोन सरकारे स्थापन करण्यात आली आहेत. 
 • सैफ अल इस्लामबरोबरच लीबियाचे माजी गुप्तचर विभाग प्रमुख अब्दुल्लाह सेनुस्सी व पंतप्रधान बगदादी अली महमुदी यांनाही फाशी सुनाविण्यात आली. 
 • लीबियावर सुमारे चार दशके राज्य केलेल्या गद्दाफी याला ऑक्टोबर २०११ मध्ये ठार मारण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा