चालू घडामोडी : ४ फेब्रुवारी


लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. बलराम जाखड यांचे निधन

    Balram Jakhar
  • लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. बलराम जाखड यांचे ३ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. 
  • डॉ. जाखड हे १९८० ते १९८९ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष होते. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात डॉ. जाखड यांनी कृषिमंत्रिपदही भूषविले होते. जून २००४ ते मे २००९ या कालावधीत ते मध्य प्रदेशचे राज्यपाल होते.
  • बलराम जाखड यांनी पंजाब सरकारमध्येही विविध मंत्रिपदे भूषवली. १९७७ ते १९७९ दरम्यान ते पंजाब विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते. १९८० पासून ते चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून

  • संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु रेल्वे अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देशाचा अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला संसदेत सादर करतील. 
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २३ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान, दुसरा टप्पा २५ एप्रिल ते १३ मे दरम्यान होणार आहे.

परमेश्वरन अय्यर यांच्यावर स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी

  • सत्तास्थापनेनंतर पहिल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात घोषणा करून सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियान यशस्वी करून दाखवण्यासाठी निवृत्त आएयएस अधिकारी परमेश्वरन अय्यर यांना सचिवपदी नेमण्यात आले आहे.
  • स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या परमेश्वरन अय्यर यांना पेयजल व सांडपणी व्यवस्थापन विभागात सचिवपदी नेमण्यात आले आहे. परमेश्वरन अय्यर यांच्यावर स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • परमेश्वरन यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल. १९८१ साली आयएएस झालेल्या परमेश्वरन यांनी २००९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
  • त्यानंतर ते जागतिक बँकेत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रमुखपदी रूजू झाले. उत्तर प्रदेशमध्ये परमेश्वरन यांनी जल सुराग अभियान राबवले होते. त्यांना पाणी, सांडपाणी व्यवस्थापनातील सुमारे वीस वर्षांचा अनुभव आहे.

लोढा समितीच्या शिफारशींवर अंमलबजावणी करण्याचे आदेश

  • लोढा समितीने दिलेल्या शिफारशी योग्य असल्याचे सांगत त्यांची अंमलबजावणी महिनाभरात करावी, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिला आहे.
  • लोढा समितीच्या शिफारशी या थेट आणि तर्कसंगत आहेत. त्यामुळे त्यांचा अनादर होऊ नये. या शिफारशी नाकारण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्यांची महिनाभरात अंमलबजावणी करावी. असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • लोढा समितीने ४ जानेवारीला या शिफारशी सादर केल्या होत्या, पण त्यावर कोणतेच भाष्य बीसीसीआयने आतापर्यंत केलेले नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी बीसीसीआयला ३ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
 का बनवली लोढा समिती? 
  • सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जस्टिस आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वात लोढा समिती गठित केली होती. 
  • या समितीच्या अहवालाच्या आधारे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन (चेन्नई सुपरकिंग्जचा अधिकारी) आणि राज कुंद्रा (राजस्थान रॉयल्सचा मालक) यांच्यावर आजीवन बंदीची शिक्षा जाहीर झाली. 
  • चेन्नई, राजस्थान या दोन्ही संघांना २ वर्षांसाठी आयपीएलमधून निलंबित केले.
 लोढा समितीच्या शिफारशी 
  • क्रिकेट मंडळाचे व्यवस्थापन राजकीय नेते, मंत्री, व्यावसायिक यांच्या हाती नव्हे, तर माजी खेळाडूंकडे असले पाहिजे. 
  • मंडळाला सोसायटीऐवजी पब्लिक ट्रस्ट किंवा कंपनीत बदलण्यात यावे. कामकाजात पारदर्शकता येईल.
  • मंडळाच्या रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलमध्येही बदल करण्याची शिफारस. यामुळे पैशाच्या व्यवहारात पारदर्शकता येईल.
  • सध्या बीसीसीआय तामिळनाडू सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट, १९७५ नुसार रजिस्टर्ड आहे. यालाही बदलता येऊ शकेल.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नव्याने स्थापना केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक निरीक्षण गटात भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे.

‘एमसीएक्स’ला अॅसोचॅमचा पुरस्कार

  • भारतातील क्रमांक एकचा वस्तू वायदा बाजार मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स)ने अॅसोचॅमने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या १४व्या कमॉडिटी फ्युचर्स मार्केट समीट आणि प्रावीण्य पुरस्कार सोहळ्यात मानाचा पुरस्कार पटकावला.
  • भारताच्या वस्तू वायदा बाजारामध्ये विविध किंमत आणि जोखीम व्यवस्थापनाचे मजबूत आणि कार्यक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल एमसीएक्सला या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
  • केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते एमसीएक्सचे सह व्यवस्थापकीय संचालक पी. के. सिंघल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सगळ्यात हलकी आणि स्वस्त रिव्हॉल्वर

  • महिला सुरक्षा भारतात चिंतेचा विषय झाला आहे. निर्भया प्रकरणानंतर तर महिला सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भिक’ आणि ‘निडर’ अशी दोन रिव्हॉल्वर बाजारात दाखल झाली आहेत.
  • यातील अॅल्युमिनिअम पासून तयार केलेल्या ‘निडर’ रिव्हॉल्वरची निर्मिती इशापूरच्या रायफल फॅक्टरीत झाली आहे. फक्त २५० ग्रॅम वजनाची ‘निडर’ रिव्हॉल्वर ‘निर्भिक’ रिव्हॉल्वर पेक्षा वजनाने खूपच हलकी आहे.
  • महिला आणि पुरुषांच्या त्यांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी वापरता येईल आणि सहज हाताळता येईल या दृष्टीने या ‘निडर’ रिव्हॉल्वर तयार करण्यात आली आहे. या रिव्हॉल्वरमधून ८ गोळ्या झाडता येतील.
  • शस्त्र परवानाधारक व्यक्तीच ‘निडर’ रिव्हॉल्वर वापरू शकेल. हे रिव्हॉल्व्हर २२ कॅलिबरचे असून त्याची किंमतही ‘निर्भिक’ रिव्हॉल्वर पेक्षा कमी आहे. हे देशातील सर्वाधिक हलक्या वजनाचे, सक्षम आणि स्वस्त रिव्हॉल्व्हर असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.

झिका व्हायरसवर जगातील पहिली लस

  • भारत बायोटेक इंटरनॅशनलने झिका व्हायरसवर जगातील पहिली लस निर्माण केल्याचा दावा केला आहे. ९ महिन्यांपूर्वीच यासाठीचा पेटंट अर्ज दाखल केल्याचे हैदराबादच्या या कंपनीने सांगितले आहे.
  • भारत बायोटेकचे प्रमुख डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितले की, ‘आम्ही अशा प्रकारची लस निर्माण करणारी पहिली कंपनी आहोत. झिका लसीसाठी ९ महिन्यांपूर्वीच आपण पेटंट अर्ज दाखल केला आहे.’ 
  • कंपनीने आपल्या लसीचा प्रयोग मनुष्य आणि प्राण्यांवर करण्याची परवानगी भारत सरकारकडे मागितली आहे.

जगातील सर्वात हिंसक शहर : कराकस

  • मेक्सिको सिटिजन कौन्सिल फॉर पब्लिक सिक्युरिटीने प्रसिध्द केलेया अहवालानुसार व्हेनेझुएलामधील कराकस शहर जगातील सर्वात हिंसक शहर ठरले आहे.
  • तेथे प्रत्येक वर्षी एक लाख लोकांमध्ये १२० लोकांची हत्या होत असते. व्हॉयलन्स ऑब्झर्व्हेटरीच्या अंदाजानुसार, २०१५मध्ये कराकस शहरात २७ हजारापेक्षा जास्त खुन झाले आहेत.
  • मागील चार वर्षांपासून हॉन्डूरसचा सेन पेड्रो सुला शहर यादीत वरच्या क्रमांकावर होते. मात्र यंदा कराकसने आता हे स्थान मिळवले आहे. सेन पेड्रो सुला हे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अल सल्व्हाडोरचे सेन सल्वाडोर शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टॉप-१० हिंसक शहर
देश शहर प्रति एक लाख लोकांमध्ये हत्या दर
व्हेनेझुएला कराकस ११९.८७
हॉन्डुरस सेन पेड्रो सुला १११.०३
अल सल्वाडोर सेन सल्वाडोर १०८.५४
मेक्सिको अकापुल्को १०४.७३
व्हेनेझुएला मातुरिन ८६.४५
हॉन्डुरस डिस्ट्रिटो ७३.५१
वेनेजुएला वेलेन्सिया ७२.३१
कोलंबिया पालमीरा ७०.८८
दक्षिण आफ्र‍िका केप टाउन ६५.५३
कोलंबिया कॅली ६४.२७

सरदार सिंग याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार

  • भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याच्याविरुद्ध भारतीय वंशाच्या आंतरराष्ट्रीय हॉकीपटूने लैंगिक अत्याचाराची लुधियाना पोलिसांकडे रितसर लेखी तक्रार केली आहे.
  • संबंधित तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सरदार सिंग आणि तिचे गेल्या चार वर्षांपासून संबंध आहेत. या काळात त्याने आपली मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे.
  • सरदार सिंग याने आपल्या पोटातील एका अपत्याचा गेल्यावर्षी गर्भपात करायला लावला आणि त्यानंतर त्याने आपल्याशी लग्न करण्यासही नकार दिला, असेही या तरुणीने म्हटले आहे.
  • अजून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. लुधियाना पोलीस तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा