चालू घडामोडी : १० मार्च

‘आयआरएनएसएस १एफ’चे यशस्वी प्रक्षेपण

 • दिशादर्शक उपग्रहांच्या मालिकेतील ‘आयआरएनएसएस १एफ’ या सहाव्या उपग्रहाचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत १० मार्च रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ही दिशादर्शक यंत्रणा अमेरिकेच्या ‘जीपीएस’ यंत्रणेच्या तोडीस तोड असणार आहे.
 • ‘आयआरएनएसएस १एफ’ या उपग्रहाचे वजन १४२५ किलोग्रॅम आहे. त्याचे आयुष्य १२ वर्षे असेल.
 • ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण ‘पीएसएलव्ही-सी३२’ची ही सलग यशस्वी ३४वी मोहीम होती. ही दिशादर्शक प्रणाली विकसित करण्यासाठी १४०० कोटी रुपये खर्च आला आहे. 
 • या उपग्रहावर एल-५ बॅंड आणि एस बॅंड आणि सी बॅंड ट्रान्सपॉंडर्स आहेत. त्यांच्याद्वारे दिशादर्शनाचे आणि पल्ला सांगण्याचे काम होणार आहे. तसेच यात अत्यंत अचूक असे रुबिडियमचे घड्याळही बसविण्यात आले आहे.
 • संपूर्ण दिशादर्शक यंत्रणेसाठी किमान चार उपग्रहांची गरज असते. मात्र, ही यंत्रणा अधिक अचूक व्हावी यासाठी भारत सात उपग्रहांचा वापर करणार आहे. या मालिकेतील सातवा उपग्रह ‘आयआरएनएसएस १जी’चे कामही सुरू आहे.
 • अवकाशातील सात आणि पृथ्वीवरील दोन अशा एकूण नऊ उपग्रहांच्या साहाय्याने भारतीय दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
 • भारताची दिशादर्शक यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत जगातील असा चौथा देश असेल ज्याच्याकडे स्वत:ची उपग्रह आधारीत दिशादर्शक यंत्रणा असेल.
 • इस्रो अध्यक्ष : ए. एस. किरण कुमार
भारताचे आजपर्यंतचे सोडलेले दिशादर्शक उपग्रह
१ जुलै २०१३ आयआरएनएसएस-१ए
४ एप्रिल २०१४ आयआरएनएसएस-१बी
१६ ऑक्टोबर २०१४ आयआरएनएसएस-१सी
२८ मार्च २०१५ आयआरएनएसएस-१डी
२० जानेवारी २०१६ आयआरएनएसएस-१ई
१० मार्च २०१६ आयआरएनएसएस-१एफ

सिडबीचा कोसिया संघटनेबरोबर सामंजस्य करार

 • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अर्थात सिडबीने देशातील अतिलघु, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अधिक प्रभावीरीत्या पतपुरवठा करण्यासाठी चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन (कोसिया) या संघटनेबरोबर सामंजस्य करार केला आहे.
 • या सामंजस्य करारावर सिडबीचे व्यवसाय प्रमुख के.जी. अलाई व कोसियाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम अगवान यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या सामंजस्य करारातून छोट्या उद्योगांना ५० लाख रुपयांपर्यंत पतपुरवठा करण्यात येणार आहे.
 • कोसियाला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळाली आहे. यापूर्वी सिडबीने कोसियाबरोबर ठाणे जिल्ह्यात काम केले आहे. 
 • एमएसएमई उद्योगांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व अद्ययावत असावे यासाठी सिडबीने स्माइल ही योजनाही सुरू केली आहे. यामध्ये तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी सिडबीतर्फे कर्जपुरवठा करण्यात येतो.
 • वरील सामंजस्य करार पुढे नेण्यासाठी कोसियाने एमएसएमई क्रेडिट फॅसिलिटेशन समिती स्थापन केली आहे.

उत्तर कोरियाची पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

 • उत्तर कोरियाने पूर्वेकडील किनाऱ्यावर दोन किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. 
 • दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियातील वोन्सन शहराजवळील समुद्र किनाऱ्यावर या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. 
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने उत्तर कोरियावर निर्बंध घालूनही उत्तर कोरियाकडून सतत क्षेपणास्त्रांची चाचण्या घेण्यात येत आहेत. उत्तर कोरियाने जानेवारीत हायड्रोजन बॉंब आणि गेल्या महिन्यात रॉकेट चाचणी घेतली होती.

सौदी अरेबिया आर्थिक संकटात

 • सर्वात मोठा तेल खरेदीदार अमेरिकेने तेलाची आयात कमी केल्याने सौदी अरेबिया आर्थिक गर्तेत सापडले आहे. प्रचंड अर्थसंकल्पीय तुटीमुळे सौदीला ६ ते ८ अब्ज डॉलरच्या कर्ज वित्तीय संस्थांकडून घ्यावे लागणार आहे. 
 • अमेरिकेत तेलसाठे सापडल्यानंतर सौदीकडून निर्यात होणाऱ्या तेलाची मागणी घसरली आणि त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
 • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती अतिशय कमी झाल्यामुळे या देशाच्या कमाईचा प्रमुख स्रोतच बंद झाला. त्यामुळे गेल्या वर्षी सौदीच्या अर्थसंकल्पातील तूट वाढत जाऊन १०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली.
 • परदेशातील संपत्ती विकून तसेच देशात वित्तीय बाँड काढून निधी जमवण्याचे प्रयत्नही कमी पडू लागल्याने अखेर सौदीने पाच वर्षांच्या मुदतीचे ८ अब्ज डॉलर्सपर्यंतचे कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लंडनमधील वर्सस पार्टनर्स या आर्थिक सल्लागार कंपनीची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा