चालू घडामोडी : २४ मे

नीट अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

 • राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (नीट) अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २४ मे रोजी स्वाक्षरी केली.
 • या अध्यादेशामुळे राज्यात यंदा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश सीईटीनुसार होतील. तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश नीट परीक्षेद्वारे होतील. 
 • आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन ‘नीट’बाबत राज्यांच्या विरोधाची कारणे व अध्यादेशाची परिहार्यता याची माहिती त्यांना दिली होती.
 • यानंतर राष्ट्रपतींनी अध्यादेशाबाबत आणखी माहिती आणि स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर देशाच्या महाधिवक्त्यांनी राष्ट्रपतींना नीटबाबत कायदेशीर बाजू समजावून सांगितली.  
 • यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार भारतीय वैद्यक परिषदेच्या १९५६च्या कायद्यानुसार घेतल्या जाणाऱ्या राज्यनिहाय वैद्यकीय प्रवेश परीक्षांऐवजी २०१७-१८ च्या वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर एकच परीक्षा (नीट) घ्यावी, अशी दुरुस्ती करणारा एक वटहुकूम न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने ‘नीट’च्या बाजूने निर्णय दिला होता. त्याला महाराष्ट्रासह सुमारे १५ राज्यांनी विरोध केल्यावर अध्यादेशाचा मार्ग सरकारने स्वीकारला.
 यापुढे काय होणार? 
 • आता वैद्यकीय आणि दंतवैद्यकच्या ८५ टक्के जागा भरण्यासाठी राज्ये स्वत:ची प्रवेश परीक्षा (सीईटी) घेऊ शकतात किंवा 'नीट' घेऊ शकतात. उर्वरित १५ टक्के जागा मात्र 'नीट'मार्फतच भरल्या जातील. 
 • खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांना 'नीट'मार्फतच प्रवेश द्यावे लागणार. 
 • सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी येत्या डिसेंबरमध्ये 'नीट' होईल.

ई-शंका निरसन योजना

 • करदात्यांच्या करविवरणपत्रांच्या (रिटर्न) व करविषयक शंकांचे निरसन तसेच करनिर्धारण संदर्भातील प्रश्न यांसाठी आयकर विभागाने ईमेल करनिर्धारण योजना सुरू केली आहे.
 • दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई कोलकाता व हैदराबाद या एकूण सात शहरांत ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे.
 काय आहे योजना? 
 • ई-शंका निरसन योजनेसंदर्भात सीबीडीटीने (Central Board of Direct Taxation) अधिकृत सूचना जारी केली आहे. त्यामध्ये करदात्यांकडून करनिर्धारण अधिकाऱ्याला पाठवण्यात येणाऱ्या ईमेलबाबत प्रक्रिया, त्याचे स्वरूप देण्यात आले आहे.
 • या योजनेद्वारे कर अधिकारी करदात्याला नोटिसा, समन्स इमेलने पाठवणार आहे. तसेच करदाते त्यांच्या समस्या ईमेलद्वारे आयकर विभागाला पाठवणार असून त्यांचे निरसन ईमेलद्वारेच करण्यात येणार आहे.
 • कर अधिकाऱ्यांकडून करदात्यांना पाठवण्यात येणाऱ्या सर्व ईमेलची किंवा ई-संवादाची नोंद आयकर विभाग ठेवणार आहे.

भारत-चीन सीमेवर महिलांची तुकडी

 • भारत-चीन सीमेवर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) दलातील १२ महिलांची तुकडी प्रथमच संरक्षण करताना दिसणार आहे.
 • भारत-चीन सीमेवरील चौक्या उंचीवर आहेत. याठिकाणी महिला कॉन्टेबलची १२ जणांची तुकडी प्रथमच तैनात करण्यात आली आहे.
 • देशभरातील ५०० महिला कॉन्टेबलमधून या १२ महिलांच्या तुकडीची निवड करण्यात आली आहे. यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 • अतिशय थंड आणि लहरी वातावरणात या महिला तुकडीवर १४ हजार फूट उंचीवर लडाखमधील लेह सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी असणार आहे. 
 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस 
 • आयटीबीपी या दलाची २४ ऑक्टोबर १९६२ला स्थापना करण्यात आली होती.
 • लडाखमधील काराकोरम पासपासून अरुणाचल प्रदेशातील जॅकेब-ला या ३४८८ किमी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी या दलावर आहे.

व्हिएतनामवरील बंदी अमेरिकेने उठवली

 • गेली काही दशके व्हिएतनामवर प्राणघातक शस्त्रांची विक्री करण्यावर घातलेली बंदी उठवत असल्याची घोषणा अमेरिकेने केली.
 • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहेत. व्हिएतनामचे अध्यक्ष त्रान दाई कुआंग यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली.
 • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुजन राईसही ओबामा आणि व्हिएतनामच्या अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा