चालू घडामोडी : ७ जुलै

महाराष्ट्रात पंतप्रधान पीक विमा योजना

  • महाराष्ट्रात खरीप हंगाम २०१६पासून राष्ट्रीय कृषी विमा योजना रद्द करून त्या जागी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे. यामध्ये पंधरा पिकांचा समावेश असून, यात पाच फळांचाही समावेश आहे.
  • राष्ट्रीय कृषी विमा योजना १९९९पासून सुरू होती, आता मोदी सरकारने ती बंद करून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे.
  • १० विमा कंपन्यांचा यात सहभाग असलेल्या या योजनेमध्ये तृणधान्ये व कडधान्ये याचा समावेश असून भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद यांचा समावेश आहे.
  • तर गळीत धान्यामध्ये सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळ आणि नगदी पिकात कापूस आदीचा समावेश आहे. तर संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू या फळांचाही समावेश आहे. 
  • पिकांच्या कापणीनंतर १४ दिवसांपर्यंत संरक्षण या विम्याने मिळू शकते, तसेच खराब हवामानामुळे सरासरीच्या ५० टक्क्यापेक्षा कमी उत्पन्न येण्याचा प्राथमिक अंदाज असल्यास २५ टक्के नुकसानभरपाई आगाऊ मिळणार आहे.
  • आग, वीज पडणे, वादळ, गारपीठ, चक्रीवादळ, तापमानात वाढ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, रोग व किडीचा प्रादुर्भाव यासाठीही हा विमा मिळणार आहे.
  • यामध्ये खरिपासाठी २ टक्के रब्बीसाठी १.५ टक्के व व्यापारी पिकांसाठी ५ टक्के अशा प्रकारे उर्वरित रक्कम राज्य व केंद्र शासन समप्रमाणात देणार आहे.

स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय

  • केंद्र शासनाने स्वच्छ भारत मोहिमेबरोबरच आता ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ ही मोहीम हाती घेतली आहे.
  • ज्या शाळांमध्ये स्वच्छतेबाबत सुविधा आहेत. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे. अशा शंभर शाळांची राष्ट्रपातळीवर निवड करून त्यांना ग्रीन विद्यालयाचा दर्जा देऊन सन्मानित केले जाणार आहे.
  • स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय ही मोहीम १ ते ३१ जुलै दरम्यान देशभर राबविण्यात येत आहे.
  • यात राष्ट्रीय पातळीवर १००, राज्य पातळीवर ४० व जिल्हा पातळीवर ४८ शाळा प्रत्येक राज्यात व जिल्ह्यात निवडल्या जाणार आहेत. या शाळांसाठी अ ते ड अशा चार श्रेण्या ठरविल्या आहेत.
  • आजचा विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक आहे, तो चांगला घडावा, बालवयातच स्वच्छतेचे धडे नवीन पिढीला मिळावेत या हेतूने शासनाने ‘स्वच्छ भारताला स्वच्छ विद्यालयाची’ जोड दिली आहे. 
 स्वच्छ विद्यालयासाठी निकष 
  • शाळेत पिण्याचा पाण्याची सुविधा आवश्यक
  • स्वच्छता गृह असणे गरजेचे
  • विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हॅंडवॉश स्टेशन असावे
  • पाण्याचा योग्य उपयोग
  • वाया जाणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन
  • हात धुण्याकरिता १० विद्यार्थ्यांमागे एक नळ अशी व्यवस्था

सिक्स पॅक बॅंडला ग्लास ग्रॅंड प्रिक्स पुरस्कार

  • ६३व्या कान्स फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी स्पर्धेत भारतातील पहिल्या तृतीयपंथी बॅंड सिक्स पॅकने ग्लास ग्रॅंड प्रिक्स पुरस्कारावर आपले नाव कोरले.
  • जगभरातील हजारांहून अधिक बॅंड (संघ) या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यापैकी सिक्स पॅकने बाजी मारली. हा पुरस्कार जिंकण्याची भारताची पहिलीच वेळ आहे.
  • या स्पर्धेत भारतातील आणखी चार बॅंडही सहभागी झाले होते.
  • हम है हॅप्पी या सिक्स पॅकच्या व्हिडिओ आठवडाभरात १.६ दशलक्ष लोकांनी पाहिला.
  • त्यानंतर बॅंडने आणखी चार व्हिडिओ प्रसिद्ध केले. त्याचा एकूण २५ दशलक्ष जणांनी आनंद लुटला. 

‘झिका’वरील लसीच्या निर्मितीमध्ये प्रगती

  • डासांमुळे होणाऱ्या ‘झिका’ विषाणूचा प्रादुर्भाव होत असून, याच्या रुग्णांची संख्या देशभरात वाढत आहे.
  • त्यावरील प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ‘सनॉफी’ ही फ्रान्समधील औषधनिर्माण कंपनीने संशोधन करीत आहे.
  • जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक लहान कंपन्या ‘झिका’ प्रतिबंधक औषधावर संशोधन करीत असल्या तरी, या क्षेत्रात काम करणारी ‘सनॉफी’ ही जगातील एकमेव मोठी कंपनी आहे. 
  • अमेरिकेतील ‘वॉल्टर रिड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च’ (डब्ल्यूआरएआयआर) यांनी यासाठी कंपनीला मदतीचा हात पुढे केला आहे.
  • निष्क्रिय विषाणूंच्या मदतीने तयार या लसीची चाचणी उंदरांवर घेण्यात आली असून, त्याचे चांगले परिणाम सकारात्मक आले आहेत.
 ‘झिका’मुळे होणाऱ्या व्याधी 
  • गर्भवतींना डास चावून ‘झिका’ची लागण झाल्यास जन्मतः बाळामध्ये व्याधी निर्माण होतात. त्याच्या मज्जातंतूवर परिणाम होतो.
  • बाळाच्या डोक्याचा आकार सामान्य न राहता लहान राहतो. मज्जातंतूदाह, संसर्गानंतर थकवा येणे, स्नायू लुळे पडणे असे शारीरिक त्रास यामुळे होतात. 

चीनचे सर्वात मोठे ‘वाय-२०’ विमान लष्करात दाखल

  • चीनने देशांतर्गत निर्मिती केलेले सर्वात मोठे ‘वाय-२०’ हे सैन्याची आणि मालाची दीर्घ पल्ल्यापर्यंत कोणत्याही मोसमात वाहतूक करणारे विमान लष्कराच्या ताफ्यात दाखल केले.
  • जवळपास २०० टन वजनाचे साहित्य नेण्याची या विमानाची क्षमता आहे. हे विमान कोणत्याही हंगामामध्ये सामान आणि सैनिकांना अतिशय दूर अंतरावर नेऊ शकते.
  • राष्ट्रीय सुरक्षेसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतकार्य करण्यासाठी तसेच सैनिकांच्या गरजा योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी या विमानाची चीनला मोठी मदत होणार आहे.
  • या विमानाची तुलना रशियानिर्मित आयएल-७६ आणि अमेरिकेच्या सी-१७ सोबत करण्यात येत आहे. 

सातवेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम

  • लेहक्पा शेर्पा या मूळच्या नेपाळच्या असलेल्या या ४२ वर्षीय महिलेने जगातील सर्वात उंच हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर सात वेळा यशस्वीपणे पादाक्रांत केले.
  • हा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट शिखराची उंची ८,८४८ मीटर असून हे शिखर तिबेटच्या सीमारेषेवरून त्यांनी पार केले.
  • लेहक्पा यांनी सर्वप्रथम सन २०००मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केले होते, त्यावेळी त्या नेपाळमधील पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या होत्या.
  • लेहक्पा या सध्या अमेरिकेच्या नागरिक असून त्यांनी सहाव्यांदा शिखर सर केल्यानंतर गिनिज बुकमध्ये त्याची नोंद झाली. या वर्षी त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडीत काढत नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे.
  • लेहक्पा यांच्या यशावर आधारित ‘डॉटर्स ऑफ एव्हरेस्ट’ नावाचा एक लघुपट तयार करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा