चालू घडामोडी : १३ जुलै

नजमा हेपतुल्ला आणि जी. एम. सिद्धेश्वर यांचा राजीनामा

 • केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला आणि अवजड उद्योग राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वर यांनी पदांचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोघांचाही राजीनामा स्वीकारला आहे.
 • अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे आता या खात्याचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता ७७ झाली आहे. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल केले, तेव्हाच हेपतुल्ला आणि सिद्धेश्वर यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.
 • पंतप्रधानांनी मंत्र्यांसाठी ७५ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार, हेपतुल्ला यांनी नुकतीच ७५ वर्षे पूर्ण केल्याने त्यांचा राजीनामा निश्चित होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाला, तेव्हा रमझान सुरू असल्याने त्यांचा राजीनामा पुढे ढकलण्यात आला होता.
 • मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अन्य पाच राज्यमंत्र्यांसोबतच सिद्धेश्वर यांचाही राजीनामा अपेक्षित होता; मात्र संपर्कातील गोंधळामुळे त्यांचा राजीनामा टळला होता. सुमार कामगिरीमुळेच सिद्धेश्वर यांचे मंत्रिपद गेल्याचे मानले जात आहे. 
 • नागरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन या खात्यांचा कार्यभार सांभाळण्यात कमी पडलेले राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्याकडून ही खाती काढून घेण्यात आली असून, त्यांच्याकडे कमी महत्त्वाच्या अवजड उद्योग खात्याचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले. 

दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा दावा अयोग्य

 • दक्षिण चीन समुद्रावर चीनने केलेला मालकी हक्काचा दावा अयोग्य असून त्याला कायदेशीर व ऐतिहासिक आधार नाही, असा निकाल द हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाने दिला आहे.
 • चीन आणि फिलिपिन्समध्ये बऱ्याच काळापासून दक्षिण चीन समुद्राच्या मालकीचा वाद सुरू होता. त्यात चीनने हा समुद्र आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे, असा दावा नेहमीच केला होता.
 • फिलिपिन्सने दाखल केलेल्या या खटल्यावरील निकाल जाहीर होताच चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाने तो मान्य करण्यास साफ नकार दिला आहे.
 • आंतरराष्ट्रीय लवाद बेकायदेशीर असून दक्षिण चीन समुद्रातील वाद हा त्याच्या अधिकार कक्षेतील विषय नाही, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चिनी परराष्ट्र मंत्रालय यांच्या वतीने सांगण्यात आले.
 दक्षिण चीन समुद्रातील गुंता 
 • चीनने १९४७साली प्रसिद्ध केलेल्या नकाशांमध्ये सर्वप्रथम ‘नाइन डॅश लाइन’ नावाने साधारण अर्धगोलाकार सीमा आखून दक्षिण चीन समुद्राच्या ९० टक्क्यांहून अधिक भागावर आपल्या मालकी हक्काचा दावा केला.
 • शेकडो वर्षांपूर्वी चीनच्या सम्राटांनी या भागातील बेटांचा शोध लावला आणि तेथे पूर्वापार चीनचे मच्छीमार व्यापार करीत आहेत. त्यामुळे तो भाग आपलाच आहे, असा चीनचा दावा आहे.
 • त्याला शेजारील फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, ब्रुनेई आदी देशांचा विरोध असून या सर्व देशांनीही या प्रदेशावर आपापल्या मालकी हक्काचा दावा केला आहे.
 • गेल्या काही वर्षांत चीनने अन्य सर्व देशांचे दावे धुडकावून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगितला आहे. तसेच तेथे भराव टाकून कृत्रिम बेटे तयार करण्याचा सपाटा लावला आहे.
 • जानेवारी २०१३मध्ये चीनच्या नौदलाने फिलिपिन्सच्या लुझॉन बेटांजवळील स्कारबरो शोल नावाने ओळखल्या जाणाऱ्या बहुतांशी पाण्याखाली असलेल्या खडकाळ बेटांच्या रांगेचा जबरदस्तीने ताबा घेतला.
 नाइन डॅश लाइन म्हणजे काय? 
 • दक्षिण चीन सागरावर, चीनने १९४७ पासून काढण्यात आलेल्या एका नकाशाच्या आधारे दावा करण्यास सुरुवात केली होती.
 • त्यात दक्षिण सागर ते चीनदरम्यान एक रेषा दाखवण्यात आली होती. त्याला नाइन डॅशन लाइन असे म्हणतात. ती रेषा सर्व दक्षिण सागराला व्यापणारी आहे.
 • चीनचे मच्छीमार या भागात अनेक शतकांपासून मासेमारी करतात असा चीनचा दावा आहे.
 निकालाची पार्श्वभूमी 
 • चीनबरोबर १७ वर्षे वाटाघाटी केल्यानंतरही त्यातून मार्ग न निघाल्याने फिलिपिन्सने आंतरराष्ट्रीय लवादाकडे चीनच्या विरोधात २०१३मध्ये तक्रार दाखल केली. मात्र चीनने या खटल्यात सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘यूएन कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सी’ या कराराचा भंग चीनने केल्याचे फिलिपिन्सने सांगितले आहे. या करारावर चीन आणि फिलिपिन्स दोन्ही देशांनी सह्या केल्या आहेत. 
 चीनला फायदा काय? 
 • दक्षिण चीन समुद्रातील स्प्रॅटले आणि पॅरासेल द्वीपसमूहांच्या आसपास मोठय़ा प्रमाणात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे असल्याचे अहवाल आले आहेत. जगातील एकूण मत्स्यसंपदेपैकी १२ टक्केमासे या क्षेत्रात आहेत.
 • जागतिक वार्षिक सागरी व्यापाराच्या एकतृतीयांश म्हणजे सुमारे ५ ट्रिलियन डॉलर इतका सागरी व्यापार या क्षेत्रातून होतो. त्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.
 अमेरिकेची कूटनीती 
 • चीनच्या आक्रमक विस्तारवादी धोरणांमुळे अमेरिकेचे या क्षेत्रातील हितसंबंध धोक्यात आले आहेत. 
 • त्यामुळे भारतासह पॅसिफिक क्षेत्रातील देशांशी अधिक जवळचे संबंध तयार करण्याकडे भर देण्यात येत आहे.
 • भारत-अमेरिका यांच्यातील गेल्या काही वर्षांतील वाढलेल्या संबंधांना हीदेखील पार्श्वभूमी आहे.

राज बब्बर उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष

 • सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून काँग्रेसने या राज्यातील पक्षाची धुरा ज्येष्ठ नेते राज बब्बर यांच्याकडे सोपविली आहे.
 • राज बब्बर यांची उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी केली.
 • अध्यक्ष राज बब्बर यांच्यासह राजाराम पाल, राजेश मिश्रा, भगवती प्रसाद आणि इम्रान मसूद यांची पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 • राज बब्बर यांनी उत्तरप्रदेशमधून दोनवेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजप नेते जनरल व्हि. के. सिंग यांच्याकडून राज बब्बर यांना पराभूत व्हावे लागले होते.
 • राज बब्बर सध्या उत्तराखंडमधून राज्यसभा सदस्य आहेत. १९८९मध्ये राज बब्बर यांनी जनता दल या पक्षातून राजकारणाच्या मैदानात उडी मारली.
 • त्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. २००६ मध्ये समाजवादी पार्टीने त्यांना निलंबित केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भारताचे गॉल्फर लाहिरी, चौरासिया आणि आदिती रिओसाठी पात्र

 • भारताचे गॉल्फर अनिर्बन लाहिरी आणि एसएसपी चौरासिया हे आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. युवा गॉल्फर आदिती अशोक महिला गटात सहभागी होणार आहे.
 • ११२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गॉल्फचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे.
 • आंतरराष्ट्रीय गॉल्फ फेडरेशनच्या क्रमवारीनुसार पुरुष गटात लाहिरी आणि चौरासिया रिओसाठी पात्र ठरले.
 • आशियाई क्रमवारीत लाहिरी अव्वल क्रमांकावर असून, जागतिक क्रमवारीत तो ६२व्या स्थानावर आहे. इंडियन ओपन चॅम्पियन असलेला चौरासिया जागतिक क्रमवारी २०७व्या स्थानावर आहे.
 • आंतरराष्ट्रीय गॉल्फ फेडरेशनच्या क्रमवारीत लाहिरीला २०वे, तर चौरासियाला ४५वे स्थान देण्यात आले आहे. या दोन भारतीय खेळाडूंनी अधिकृतरित्या रिओसाठीच्या ६० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.
 • लाहिरीने सात आंतरराष्ट्रीय किताब मिळवले आहेत. गेल्यावर्षी प्रेसिडेंट कपमध्ये आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा पहिला भारतीय गॉल्फर होण्याचा मान लाहिरीने मिळवला होता. २००६च्या दोहा एशियाडमध्ये त्याचा भारतीय संघात समावेश होता. या संघाने रौप्यपदक मिळवले होते.
 • चौरासियाने चार आंतरराष्ट्रीय किताब मिळवले आहेत. यात तीन युरोपीयन टूर किताबांचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने इंडियन ओपन स्पर्धा जिंकली होती.
 • या स्पर्धेत एकापेक्षा अधिक खेळाडू पात्र ठरलेले २४ देश आहेत. त्यातील भारत एक आहे. आशियातून १७ देशांचे खेळाडू सहभागी होतील.
 • ऑलिम्पिकमधील गॉल्फची स्पर्धा ११ ते १४ ऑगस्टदरम्यान रिओ दी जानेरोच्या ऑलिम्पिक गॉल्फ कोर्सवर होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा