चालू घडामोडी : १७ जुलै

पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे नववे मुख्यमंत्री

  • अरुणाचल प्रदेशमध्ये नाट्यमयरीत्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर पेमा खांडू यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर चौना मेन यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
  • बहुमत सिद्ध करण्यासाठी काही तास शिल्लक असताना विद्यमान मुख्यमंत्री नाबाम तुकी यांनी अचानक राजीनामा दिला, तर त्यांच्या जागी नवे नेते म्हणून पेमा खांडू यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • काँग्रेसच्या या निर्णयामुळे सहा महिन्यांपूवी बंडखोरी करून पक्ष सोडून गेलेले काँग्रेसचे सर्व ३० आमदार स्वगृही परतले व त्यांनी खांडू यांचे नेतृत्त्व मान्य केले.
  • अरुणाचलच्या ६० सदस्यीय विधानसभेत आता आमदारांची संख्या ५८ असून खांडू यांनी राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे ४७ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
 पार्श्वभूमी 
  • सहा महिन्यांपूर्वी नबाम तुकी यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून ३० आमदार काँग्रेसमधून बाहेर पडले होते.
  • त्यांना हाताशी धरून आणि राज्यपालांचा राजकीय डावपेचात वापर करून भाजपाने आधी राष्ट्रपती राजवट लागू केली व नंतर बंडखोर काँग्रेस नेते खालिको पुल यांचे सरकार स्थापन केले होते.
  • १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने बंडखोरांना दणका देतानाच पुन्हा तुकी यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली होती.
  • १६ जुलै रोजी विद्यमान मुख्यमंत्री तुकी यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपाल तथागत रॉय यांनी दिले होते. मात्र काँग्रेसने नेतृत्त्वबदल केल्याने शक्तिप्रदर्शन करण्याची वेळच आली नाही.
 पेमा खांडू 
  • अरुणाचल प्रदेशातील कॉंग्रेसचे वजनदार नेते आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे पेमा खांडू हे पुत्र आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेशचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
  • त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित हिंदू महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. त्यांच्या वडिलांचा दोरजींचा २०११ मध्ये एका हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू झाला.
  • खांडू हे भारत-चीन सीमेवरील तवांग येथील आहेत. वडिलांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत प्रवेश केला.
  • त्यांची कॅबिनेटमध्ये जलसंधारण आणि पर्यटनमंत्री म्हणून शपथही देण्यात आली होती, ते अरुणाचल प्रदेश कॉंग्रेसचे सचिव आणि तवांग जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्षही होते.

विजेंदर सिंग डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक चॅम्पियन

  • भारताचा बॉक्सर विजेंदर सिंगने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी बॉक्सर केरी होप याचा पराभव करत ‘डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियनशीप’वर कब्जा केला.
  • हे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय बॉक्सर म्हणून विजेंदरने यावेळी इतिहास रचला. 
  • दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये सुमारे १० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत विजेंदरने तिन्ही पंचांच्या निर्णयानुसार ९८-९२, ९८-९२ १००-९० अशी गुणांच्या आधारे बाजी मारली.
  • याबरोबरच विजेंदरने आपली सलग सातवी व्यावसायिक लढत जिंकली आहे. तसेच नॉकआऊट किंग म्हणून फेमस असलेल्या विजेंदरने पहिल्यांदाच गुणांच्या आधारे लढत जिंकली आहे. 
  • १० राउंडपर्यंत खेचल्या गेलेल्या या लढतीआधी विजेंदरने आपल्या सर्व सहा लढतींचा निकाल तीन राउंडमध्येच लावला होता.

तुर्कस्तानमध्ये लष्कराचा उठाव फसला

  • तुर्कस्तानमध्ये अध्यक्ष तय्यीप एर्दोगन यांचे सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर येथील सरकारने आतापर्यंत जवळपास तीन हजार सैनिकांना आणि हजारो न्यायाधीशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
  • रणगाडे आणि हेलिकॉप्टरच्या साह्याने केलेल्या उठावानंतर उसळलेल्या हिंसाचारात २६५ जणांचा बळी गेला आहे.
  • एर्दोगन यांनी सरकार स्थिर असल्याचा दावा करत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बंडाला साह्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
  • पश्चिम आशिया व एकंदरच जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून भूमध्य समुद्र व काळ्या समुद्रास जोडणाऱ्या तुर्कस्तानचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
  • तुर्कस्तानमधील राजकीय घडामोडींचा मोठा प्रभाव आशिया व जगातील इतर भागांवर कायमच पडत आला असून वर्तमान स्थितीमध्येही या देशातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीचे परिणाम जाणवू लागले आहेत.

व्हेनेझ्युएला आर्थिक संकटात

  • आर्थिक संकटात सापडलेल्या व्हेनेझ्युएलामधील हजारो नागरिक अन्न आणि औषधे खरेदी करण्यासाठी शेजारील कोलंबियामध्ये आले.
  • सुमारे वर्षभर बंद असलेली ही सीमा १७ जुलै रोजी कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी अंशत: खुली केल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तीस हजारांहून अधिक नागरिकांनी गर्दी केली. 
  • २०१४मध्ये तेलाचे भाव कोसळल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला व्हेनेझ्युएला अद्यापही सावरलेला नाही.
  • त्यामुळे येथील लाखो नागरिकांचे सर्व दैनंदिन आर्थिक व्यवहार कोलमडले असून गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यात येथील सरकारला साफ अपयश येत असल्याने नागरिक संतप्त आहेत.
  • त्यामुळेच सरकारने कोलंबियाशी चर्चा करून १७ व १८ जुलै रोजी बारा तासांसाठी सीमा खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यामुळे कोलंबियाच्या सीमा भागातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय अचानक तेजीत आला आहे. व्हेनेझ्युएलाच्या नागरिकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर वस्तूंचा साठा करण्यात आला आहे.
  • व्हेनेझ्युएलाचे अध्यक्ष : निकोलस माडुरो

पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोच हिची हत्या

  • प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोच हिची तिच्या भावानेच गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना मुल्तानमध्ये समोर आली आहे. 
  • फेसबुकवर अश्लील व्हिडिओ आणि प्रतिक्रिया देण्यासाठी कंदिल प्रसिद्ध होती. यावरूनच तिचा भावाबरोबर वाद होत असे आणि त्यातूनच भावाने गोळ्या झाडून तिची हत्या केली.
  • कंदिलने मॉडेलिंग व अभिनय सोडावा, असा तगादा तिच्या भावाने लावला होता. एका मुस्लिम धर्मगुरूसोबत सेल्फी काढल्याने कंदिल प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
  • याबरोबरच तिने मार्चमध्ये झालेल्या ट्वेंटी-२० विश्वकरंडकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला, तर न्यूड डान्स करण्याचे जाहीर केले होते.
  • तिचे खरे नाव फौजिया अजीम होते. प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असलेल्या कंदीलची ओळख ‘ड्रामा क्वीन’ अशीच होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा