चालू घडामोडी : २१ जुलै

फॉर्च्युन-५०० मध्ये सात भारतीय कंपन्या

 • जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी असलेल्या फॉर्च्युन-५००मध्ये यंदा सात भारतीय कंपन्यांची वर्णी लागली आहे. 
 • या यादीत रिटेल क्षेत्रातील अमेरिकी कंपनी वॉलमार्ट जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
 • भारतीय कंपन्यांमध्ये इंडियन ऑईलने १६१वे स्थान पटकावत आघाडी मिळवली आहे. तर २०१६ या वर्षासाठीच्या या यादीतून ओएनजीसी बाहेर फेकली गेली आहे.
 • खासगी जेम्स अँड ज्वेलरी कंपनी असलेल्या राजेश एक्स्पोर्टने या यादीत प्रथमच प्रवेश केला असून त्याचा क्रमांक ४२३वा आहे.
 • एकूण सात भारतीय कंपन्यांपैकी इंडियन ऑइल, भारतीय स्टेट बँक, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या चार कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील आहेत.
 • खासगी कंपन्यांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. त्यानंतर टाटा मोटर्स व राजेश एक्स्पोर्ट यांचे क्रमांक लागले आहेत.
फॉर्च्युन-५०० मधील भारतीय कंपन्या
कंपनी क्रमांक
इंडियन ऑइल १६१
रिलायन्स इंडस्ट्रीज २१५
टाटा मोटर्स २२६
भारतीय स्टेट बँक २३२
भारत पेट्रोलियम ३५८
हिंदुस्थान पेट्रोलियम ३६७
राजेश एक्स्पोर्ट ४२३

जागतिक निवृत्ती निर्देशांकात भारताला ८८वे स्थान

 • नॅटिक्सिस ग्लोबल ऍसेट मॅनेजमेंटच्या चौथ्या जागतिक निवृत्ती निर्देशांकात (जीआरआय) भारताला ८८वे स्थान मिळाले आहे. ब्रिक्स देशांमध्ये भारताची कामगिरी सर्वांत वाईट ठरली आहे.
 • भारतात नोकरीतून निवृत्त झालेल्या व्यक्तींचे आयुष्य इतर देशांच्या तुलनेत सर्वांत अवघड असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.
 • निवृत्तीनंतरचे दिवस सुखात घालविता येतील अशा देशांच्या यादीत स्वित्झर्लंडने पहिला क्रमांक मिळविला आहे. या खालोखाल नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, आइसलॅंड आणि नेदरलॅंड या देशांनी क्रमांक पटकाविला आहे.
 • या अहवालात जगातील एकूण ४३ देशांतील निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानाचा अभ्यास करण्यात आला.
 • निर्देशांकात देशाचे स्थान ठरविण्यासाठी त्या देशांतील पाच वर्षांचा मुलभूत व्याजदर आणि महागाईच्या सरासरीचा अभ्यास करण्यात आला.
 • याआधारे निवृत्तीनंतर लोकांच्या गरजा, अपेक्षा आणि विश्वासाला पात्र ठरणाऱ्या देशांच्यामध्ये तुलना करून हे निष्कर्ष काढण्यात आले.
 • २०१४मध्ये या यादीत भारताचा क्रमांक १०४वा होता. या तुलनेत भारताची थोडी सुधारणा असली तरी अद्यापही परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसल्याचेच हा अहवाल सांगत आहे. 

भारतामध्ये १०.९६ लाख नागरिकांना ‘एचआयव्ही’ची लागण

 • भारतामध्ये गेल्या वर्षात सुमारे १०.९६ लाख नागरिकांना नव्याने ‘एचआयव्ही’ची लागण झाली आहे, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
 • ‘दी न्यू ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१५’ (जीबीडी : २०१५) हा अहवाल ‘दी लॅन्सेट’ या एचआयव्ही जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
 • या अहवालात देशात एकूण २८.८१ लाख जण एचआयव्हीने बाधित असल्याचे समोर आले आहे. जगभरात ‘एचआयव्ही’ची लागण होण्याचा वेग संथ गतीने मंदावत आहे.
 • गेल्या दहा वर्षांत (२००५-२०१५) नव्याने लागण प्रमाण केवळ ०.७ टक्के आहे. हेच प्रमाण १९९७ ते २००५ दरम्यान २.७ टक्के होते.
 • जगभरात एचआयव्ही बाधित व्यक्तींचे प्रमाण वाढत चालले असून, सन २०००मध्ये २.७९ कोटी जण एचआयव्हीने बाधित होत्या. २०१५मध्ये हाच आकडा ३.८८ कोटी इतका झाला.
 • एड्सने वर्षाला मृत्यू झालेल्यांच्या संख्येत घट होत चालली आहे. २००५मध्ये १८ लाख तर २०१५मध्ये १२ लाख जणांचा या आजाराने मृत्यू झाला होता. अँटीरिट्रोव्हायरल थेरपीमुळे (एआरटी) मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
 • मात्र, गेल्या दहा वर्षांत नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये फारसा फरक पडलेला नाही, ही चिंतेची बाब आहे.

खलिदा जिया यांच्या मुलाला सात वर्षांची शिक्षा

 • बांगलादेशच्या मुख्य विरोधी पक्षनेत्या खलिदा जिया यांच्या मोठ्या मुलाला सात वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. आर्थिक गैरव्यवहाराचा त्याच्या मुलावर आरोप ठेवण्यात आला आहे.
 • आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तारिक रेहमान याच्यावर २०१३मध्ये गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.
 • या निकालाविरोधात उच्च न्यायालयात आपिल करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही रेहमान यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली.
 • दोन वेळा पंतप्रधान झालेल्या खलिदा जिया यांचा तारिक हा मोठा मुलगा आहे. खलिदा जिया यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात आहे.

तुर्कस्तानचे तीन महिन्यांची आणीबाणी

 • लष्करी बंडामागे असलेल्या दहशतवादी गटांचा शोध घेण्यासाठी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी तीन महिन्यांची आणीबाणी घोषित केली आहे.
 • तुर्कस्तानच्या लष्करातील नाराज सैनिकांच्या एका गटाने सत्तापालटाचा प्रयत्न केला होता. लष्कराच्या बंडामुळे २५० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
 • आतापर्यंत या बंडात सहभागी २८३९ सैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 • यापूर्वी १९८७ मध्ये तुर्कीमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा