चालू घडामोडी : २४ जुलै

सीसीटीएनएस कार्यान्वित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

  • क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम (सीसीटीएनएस) पूर्णतः कार्यान्वित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
  • या यंत्रणेमुळे नागरिकांना आता घरबसल्या पोलिस ठाण्यात ऑनलाइन तक्रार नोंदविता येईल. त्यासाठी ‘ई-कम्प्लेंट’ हे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करण्यात येणार आहे.
  • प्रायोगिक तत्वावर पुणे शहरात सीसीटीएनएसची सुरवात करण्यात येत आहे. त्यातील अडचणी, त्रुटी दूर करून लवकरच ती संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल.
  • नागरिकांना www.mhpolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना आपली ई-तक्रार नोंदविता येईल. 

सय्यद हैदर रझा कालवश

  • विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सय्यद हैदर रझा उर्फ एस.एच. रझा (वय ९४) यांचे २३ जुलै रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 
  • भारतात आधुनिक व बंडखोर विचारांच्या चित्रकलेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ‘बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस् ग्रुप’च्या अध्वर्यूंपैकी रझा एक होते.
 रझा यांचा जीवनप्रवास 
  • सय्यद यांचा जन्म सन १९२२मध्ये मध्यप्रदेशमधील मंडला जिल्ह्यातील बाबरिया या ठिकाणी झाला. रझा यांचे वडील वनाधिकारी होते.
  • महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामधील नागपूर कला विद्यालयामध्ये १९३९ ते १९४३ मध्ये कलेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. 
  • पुढील कलेच्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील जे. जे. कला विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. मुंबईमध्ये त्यांनी १९४३ ते १९४७ या काळात शिक्षण घेतले.
  • त्यानंतर त्यांनी पॅरिसमध्ये पुढील चित्रकला शिक्षण घेतले. त्यांनी जवळपास ६० वर्षे फ्रान्समध्ये वास्तव्य केले. युरोपमध्ये भ्रमंती केल्यावर सन २०११ मध्ये ते भारतात परतले. 
  • १९८३ साली ललित कला अकादमीमध्ये रझा यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. भारत सरकारने  १९८१ मध्ये पद्मश्री तर २००७ साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांच्या कलेचा गौरव केला होता.
  • २०१० साली भारताचे आधुनिक आणि सर्वाधिक महागडे कलाकार म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. सौराष्ट्र नावाच्या त्यांच्या चित्र संग्रहाला १६.४२ कोटी एवढी किंमत मिळाली होती.

काबुलमध्ये दहशतवादी हल्ला

  • अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या बॉम्बस्फोटात ८० जण ठार, तर २३१ जण जखमी झाले आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.
  • काबुलमधील देह मझांग चौकात हजारा समूदायाचे लोक आंदोलन करत होते. तेव्हा ३ आत्मघाती हल्लेखोरांनी स्वतःला उडवून घेतले.
 ‘तुतॉप पॉवरलाइन’चा तिढा 
  • तुर्कमेनिस्तानहून काबुलला जोडण्यात येणारी ५०० किलोव्हॅटची ‘तुतॉप पॉवरलाइन’ बामियान प्रांतातून अन्यत्र हलविण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात हजारा शिया समूदायातील लोक आंदोलन करत होते.
  • तुतॉप पॉवरलाइन तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तानसह ऊर्जा संकटास सामोरे जाणाऱ्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या मध्य आशियाई देशांना जोडणार आहे.
  • ही पॉवरलाइन अफगाणिस्तानच्या मध्य प्रांतातून जाणार होती; पण नंतर सरकारने ती सलांग या डोंगराळ भागातून नेण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
 हजारा कोण? 
  • पर्शियन भाषा बोलणाऱ्या शिया हजारा समुदायातील लोकांची संख्या नऊ टक्के एवढी असून अफगाणिस्तानातील तो तिसरा सर्वांत मोठा समुदाय म्हणून ओळखला जातो.
  • हजारांना अफगाणिस्तानात पूर्वीपासून दुय्यम स्थान देण्यात आले असून तालिबानींच्या राजवटीमध्ये हजारो शिया हजारांना ठार मारण्यात आले होते. त्यामुळे या समुदायात असुरक्षिततेची भावना दिसून येते.

२९ वर्षांच्या सेवेनंतर आयएनएस विराट निवृत्त

  • जगातील सर्वांत जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून ‘गिनिज बुक’मध्ये नोंद असलेली ‘आयएनएस विराट’ २९ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहे.
  • नौदलात विराट कामगिरी बजावलेल्या या युद्धनौकेवरील सगळा भार आता २०१३मध्ये नौदलात दाखल झालेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर गेला आहे.
  • विशाखापट्टणम येथे याच वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूमध्ये भाग घेतल्यानंतर विराट नौदलाच्या पश्चिम विभागाच्या गोदीत नांगर टाकून उभी होती.
  • कोचिन शिपयार्डमध्ये तिच्यात काही महत्त्वाची दुरुस्ती करून नंतर ती वर्षाच्या अखेरीस पुन्हा मुंबईत आणली जाईल आणि तिला समारंभपूर्वक निवृत्त केले जाईल.
  • व्हाईट टायगर म्हणून नावाजली गेलेली ‘सी हॅरिअर फायटर एअरक्राफ्ट’ या युद्धनौकेवर होती. गोव्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांनाही निवृत्ती देण्यात आली. 
  • भारतीय नौदलात १२ मे १९८७ मध्ये दाखल झालेली ‘आयएनएस विराट’ त्या वेळी देशातील दुसरी विमानवाहू युद्धनौका होती.
  • २,२५० दिवस गस्तीवर असलेल्या या युद्धनौकेने ५,८८,२८८ समुद्री मैल अंतर प्रवास केला. विराटने संपूर्ण पृथ्वीची २७ वेळा प्रदक्षिणा होईल एवढा जलप्रवास सहा वर्षांत केला.
  • भारतीय नौदलापूर्वी २७ वर्षे तिने युनायटेड किंगडमच्या ‘रॉयल नेव्ही’साठी एचएमएस हर्मेस नावाने कामगिरी बजावली होती. १९८२च्या फाल्कच्या भू अभियानाच्या वेळी रॉयल नेव्हीची ‘फ्लॅगशिप’ म्हणूनही तिने कामगिरी बजावली होती.

तीन चिनी पत्रकारांना देश सोडण्याचा इशारा

  • गुप्तचर खात्याने व्यक्त केलेल्या चिंतेमुळे शिन्हुआ या चीन सरकारच्या वृत्तसंस्थेसाठी भारतात काम करणाऱ्या तीन पत्रकारांचा भारतातील मुक्काम वाढवण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे.
  • या तीन पत्रकारांना ३१ जुलैपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिला आहे. 
  • हे तीन पत्रकार फसवी नावे घेऊन देशातील प्रवेशावर निर्बंध असलेल्या विविध संवेदनशील ठिकाणांना भेट देत असल्याचे गुप्तचर खात्याने म्हटले आहे.
  • वू किआंग, तांग लू आणि मी किआंग या तीन पत्रकारांचा व्हिसा महिनाअखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यांनी उत्तराध‌किारी येईपर्यंत मुक्काम वाढवण्याची परवानगी मागितली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा