जुनो यान 'गुरू'च्या कक्षेमध्ये दाखल

 • सौरमालेतील सर्वांत मोठा ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरूचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रक्षेपित केलेले ‘जुनो’ हे अंतराळयान ४ जुलै रोजी गुरू ग्रहाच्या कक्षेमध्ये पोहोचले.
 ‘जुनो’ 
 • सूर्यमालेतील सर्वात मोठ्या ग्रहाच्या उत्पत्तीचे गूढ जाणून घेण्यासाठी नासाने ५ ऑगस्ट २०११ला ‘जुनो’ प्रक्षेपित केले होते. ‘जुनो’ मिशनवर आतापर्यंत १ अब्ज डॉलर इतका खर्च करण्यात आला आहे.
 • अवकाशातील गुरू ग्रह म्हणजे नैसर्गिक वायूचा गोळा होय, त्याचे आकारमान पृथ्वीपेक्षा तीनशे पटीने अधिक आहे. या ग्रहावरील तीव्र किरणोत्सारी भागाचा अभ्यास करणे हा या अंतराळयानाचा मुख्य उद्देश आहे.
 • हे अंतराळयान गुरूच्या पृष्ठभागाची छायाचित्रे टिपण्याबरोबर या ग्रहाची माहितीदेखील संकलित करेल, यामुळे सौरमालेचा इतिहास समजण्यास मदत होईल.
 • गॅलिलिओनंतर गुरूच्या कक्षेमध्ये पोचलेले जुनो हे दुसरे अंतराळयान आहे. याआधी नासाचे गॅलिलिओ यान गुरु ग्रहाच्या कक्षेत जाऊन आठ वर्षे तेथे राहिले होते.
 • ज्युनो यानाने केलेला १.७ अब्ज किमीचा प्रवास हा सौरऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्याही अंतराळ यानाने केलेला सर्वात दूरवरचा प्रवास आहे.
 • ज्युनो हे यान गुरुच्या ढगांच्या आवरणापासून ३,१०० मैल एवढे जवळ जाईल. हे अंतराळयान पुढील २० महिने गुरूभोवती ३७ वेळा भ्रमण करेल
 • यादरम्यान गुरू ग्रहावरील चुंबकीय आणि गुरूत्वाकर्षण क्षेत्रांचा अभ्यास हे अंतराळयान करेल, तसेच गुरूची अंतर्गत संरचना नेमकी कशी आहे, याचीदेखील माहिती देईल.
 • याशिवाय गुरू ग्रहाच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा वेध घेतला जाणार असून, या माध्यमातून पृथ्वीच्या निर्मिती प्रक्रियेचादेखील अभ्यास केला जाईल.
 • या मोहिमेमध्ये गुरूची संपूर्ण माहिती संकलित केली जाईल. हे मिशन २० फेब्रुवारी २०१८मध्ये संपेल. त्यानंतर जुनो गुरू ग्रहावर पाडले जाणार आहे.
 • यापूर्वी ‘गुरु’ ग्रहाशी निगडीत निरीक्षणांसाठी ‘पायोनिअर’, ‘व्हॉयेजर’ आणि ‘गॅलिलिओ’ ही याने पाठविण्यात आली होती.
 गॅलिलिओ 
 • मानवाने गुरु ग्रहाच्या अंतरंगात डोकावण्यासाठी विविध प्रकारच्या अंतराळ मोहिमा १९७५ पासून सुरु केल्या. 
 • गुरूच्या अभ्यासासाठी प्रक्षेपित करण्यात आलेले गॅलिलिओ हे अंतराळयान २१ सप्टेंबर २००३ रोजी गुरूवर कोळसले होते. 
 • गॅलिलिओने युरोपा, गेनीमेड आणि कॅलिस्टो या गुरुच्या तीन चंद्रांच्या पृष्ठभागाखाली खाऱ्यापाण्याचे साठे असल्याचे पुरावे शोधले होते.
 • या अंतराळयानाने संकलित केलेली माहिती सुरक्षित राहावी म्हणून ते गुरूवरच पाडण्याचा निर्णय संशोधकांनी घेतला होता.
 जुनो आणि पुराणकथा 
 • जुनो हे नाव ग्रीक आणि रोमन पुराणकथांवरून देण्यात आले आहे.
 • ज्युपिटर हा देव आपला खोडकरपणा लपवण्यासाठी स्वतःभोवती ढगांचा पडदा ओढून घेतो मात्र त्याची पत्नी जुनो ही ढगांचा पडदा भेदून त्याचे खरे रूप समोर आणते, अशी कथा आहे.
 • या मोहिमेतून गुरूच्या अंतर्भागाविषयी माहिती होईल, त्याशिवाय या ग्रहाची निर्मिती आणि संपूर्ण सूर्यमाला कशी विकसित होत गेली, या गोष्टीही जाणून घेता येतील.
 जुनोची संरचना 
 • सबंध विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्सुकता असणाऱ्या ‘जुनो’ या यानाची बांधणी गुरु ग्रहाच्या परिस्थितींशी संलग्न पद्धतीने करण्यात आली आहे.
 • या यानामध्ये टिटॅनियमच्या एका पेटीत नऊ प्रकारची संयंत्रे बसवण्यात आली आहेत जेणेकरुन गुरुच्या विद्युत चुंबकीय क्षेत्रापासून त्यांना कोणतीही हानी होणार नाही.
 • या संयंत्रांत ‘फ्लक्सगेट मॅग्नोमीटर’, ‘मायक्रोव्हेव रेडिओमीटर’, ‘जुनोकॅम’चा समावेश आहे.
 • या अवकाशयानात उर्जास्त्रोत म्हणून आण्विक उर्जेऐवजी सौरउर्जेचा वापर करण्यात येणार आहे. गुरु ग्रहावर पृथ्वीच्या तुलनेत २५ पट कमी सूर्यप्रकाश पोहोचतो.
 • तेवढ्यावरही यानातील उपकरणे, इंजिन व यंत्रे चालविण्यासाठी लागणारी ५०० वॉट वीज मिळविण्यासाठी या यानात १८,००० सौर बॅटऱ्या असणारे, २.७ मीटर रुंदी व ९.१ मीटर लांबीचे तीन मोठे सौरपंख बसविण्यात आले आहेत.
 • गुरुभोवती फिरत असताना त्याच्या तीव्र प्रारणांपासून बचावासाठी आणि हे सौरपंख सतत फिरत राहण्यासाठी ‘जुनो’ यानाला अंडाकृती कक्षेत फिरवण्याची योजना करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा