चालू घडामोडी : ३ डिसेंबर

अमृतसरमध्ये हार्ट ऑफ एशिया परिषदेला सुरूवात

 • पंजाबमधील अमृतसरमध्ये हार्ट ऑफ एशिया परिषदेला ३ डिसेंबर रोजी सुरूवात झाली आहे.
 • भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर आणि अफगाणिस्तानचे उपविदेश मंत्री हिकम खलील करझाई यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.
 • युद्धामुळे जर्जर झालेल्या अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करून विकासाला हातभार लावण्यासाठी शक्तीशाली देश या संमेलनात सहभागी होत आहे.
 • या परिषदेत प्रामुख्याने दहशतवाद, जहालमतवादाविरोधातील उपाय, शिक्षणाच्या क्षेत्रातील सहकार्य वाढवणे यावर चर्चा केली जाणार आहे.
 • या परिषदेत भारत, पाकिस्तान, चीन, इराण, रशिया, सौदी अरेबिया, अझरबैजानसह १४ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
 • त्याचबरोबर १७ सहयोगी देशांचे प्रतिनिधीही सामील होतील. युरोपीय संघासह ४० देश संमेलनात सहभागी होत आहेत.
 • सीमेवरील दहशतवादी कारवाया या अफगाणिस्तानसह भारतासाठीदेखील सर्वात मोठी समस्या ठरत आहे.
 • या कारवायांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधात दहशतवादाच्या मुद्यावर भारत-अफगाणिस्तानचे एकमत झाले आहे.
 • हार्ट ऑफ एशिया परिषदेत पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीज पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

जानेवारीमध्ये मुंबईत उद्योगबोध २०१७ परिषद

 • जगभरातील महाराष्ट्रीय उद्योजकांचा उपस्थिती अपेक्षित असलेली ‘उद्योगबोध २०१७’ ही जागतिक स्तरावरील औद्योगिक परिषद मुंबईत १३ व १४ जानेवारी २०१७ रोजी होत आहे.
 • १,१०० उद्योजक या परिषदेला हजेरी लावणार असून व्यावसायिक भागीदारी व देवाणघेवाणीसाठी सर्वोत्तम व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.
 • राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांचे प्रतिनिधी परिषदेला येणार असून महिलांसाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 • भांडवल, मार्केटिंग, लघू व मध्यम उद्योग, सागरी व्यवसाय संधी, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या परिषदेत करण्यात आले आहे.

बिग मॅक बर्गरचे निर्माते जिम डेलीगट्टी यांचे निधन

 • मॅकडोनाल्डच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘बिग मॅक’ बर्गरचे निर्माते जिम डेलीगट्टी यांचे २८ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
 • त्यांनी तयार केलेला बिग मॅक बर्गर एक वर्षांत मॅकडोनाल्डच्या सर्व दुकानांतील मेनूत झळकला.
 • आज एकटय़ा अमेरिकेत वर्षांला ५५० दशलक्ष बिग मॅक बर्गर विकले जातात. जगातील शंभर देशांत हा बर्गर लोकप्रिय ठरला आहे.
 • डेलीगट्टी यांचा जन्म युनियन टाउन येथे १९१८मध्ये झाला. त्यांनी कँडी मेकरपासून अनेक कामे केली.
 • कॅलिफोर्नियातील अनेक रेस्टॉरंटमध्ये त्यांनी काम केले. १९५३मध्ये डेलीगट्टी व त्यांचे मित्र जॉन स्वीनी यांनी ‘डेलनीज’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले होते.
 • नंतर त्यांनी पीटसबर्ग येथे मॅकडोनाल्डची शाखा सुरू केली. २५ वर्षांत तशी ४७ दुकाने त्यांनी सुरू केली.
 • त्यांनीच तयार केलेले हॉट केक व सॉसेज मील हे आणखी दोन पदार्थ मॅकडोनल्डच्या राष्ट्रीय मेन्यूत समाविष्ट झाले होते.
 • त्यांचा बिग मॅक बर्गर गाणी व कथांतूनही अजरामर झाला. नंतरच्या काळात उत्तर हटिंग्टन येथे त्यांनी बिग मॅक म्यूझियम सुरू केले.
 • द इकॉनॉमिस्टने बिग मॅकच्या किमतीवरून चलनाच्या चढउताराचा अंदाज देणारा बिग मॅक इंडेक्सही तयार केला होता.

जाहिरातीमध्ये मोदींचा फोटो वापरल्याप्रकरणी रिलायन्सला दंड

 • जिओच्या जाहिरातीत परवानगीशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरल्याप्रकरणी रिलायन्सला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 • सरकारची दुरसंचार कंपनी असताना खाजगी दुरसंचार कंपनीच्या जाहिरातीत पंतप्रधानांचा फोटो छापून आल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्याची दखल घेत रिलायन्सला हा दंड ठोठावण्यात येणार आहे.
 • राष्ट्रीय प्रतिके आणि नावांचा गैरवापर टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यातंर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे.
 • ग्राहक मंच. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयामार्फत राष्ट्रीय प्रतिके आणि नावांच्या गैरवापरावर देखरेख केली जाते.
 • सरकारच्या परवनागीशिवाय वापरण्यात न येणाऱ्या नाव आणि बोधचिन्हांमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, केंद्र किंवा राज्य सरकार, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरु, युएनओ, अशोकचक्र यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment