चालू घडामोडी : २ जानेवारी

भारत व पाकदरम्यान अणुआस्थापनांच्या यादीची देवाणघेवाण

 • भारत व पाकिस्तान यांनी लागोपाठ सव्विसाव्या वर्षी त्यांच्या अणुआस्थापनांच्या यादीची देवाणघेवाण केली आहे.
 • एका द्विपक्षीय करारानुसार दोन्ही देशांना एकमेकांच्या अणुआस्थापनांवर हल्ला करण्यास प्रतिबंध आहे, त्यातील तरतुदीनुसार यादीची देवाणघेवाण करण्यात आली.
 • भारत व पाकिस्तान यांनी राजनैतिक मार्गाने नवी दिल्ली व इस्लामाबाद येथे याद्यांची देवाणघेवाण केली.
 • भारत व पाकिस्तान यांच्यात एकमेकांच्या अणुआस्थापनांवर हल्ले न करण्याबाबत करारावर ३१ डिसेंबर १९८८मध्ये करार झाला होता.
 • हा करार २७ जानेवारी १९९१मध्ये अमलात आला होता. त्यानुसार दोन्ही देशांनी एकमेकांना अणुआस्थापनांची यादी दरवर्षी सादर करणे आवश्यक आहे.
 • दरवर्षी १ जानेवारीला या यादीची देवाणघेवाण होते. १ जानेवारी १९९२ पासून लागोपाठ २६व्या वर्षी या यादीची देवाणघेवाण करण्यात आली.
 • दोन्ही देशांनी त्यांच्या तुरूंगात असलेल्या कैद्यांची यादीही एकमेकांना सादर केली. राजनैतिक संपर्क कराराअंतर्गत या याद्या एकमेकांना देण्यात आल्या. याबाबतचा करार २१ मे २००८ रोजी झाला होता.

अग्नी-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 • ओडिशाच्या किनारपट्टीवरील असलेल्या अब्दुल कलाम बेटावर स्ट्रटेजिक फोर्सेस कमांडने अग्नी-४ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
 • एक टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारे अग्नी-४ हे स्वानातीत क्षेपणास्त्र ४ हजार किलोमीटरपर्यंत मारा करु शकते.
 • अग्नी-४ क्षेपणास्त्र जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे बॅलेस्टिक प्रकारातील क्षेपणास्त्र आहे.
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) वतीने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.
 • मध्यम ते लांब पल्ल्याच्या अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील हे चौथे क्षेपणास्त्र असून, सध्या ते चाचणीच्या टप्प्यात आहे.
 • आतापर्यंत अग्नी-१, २, ३ ही तीन प्रकारची क्षेपणास्त्रे लष्करी वापरासाठी सज्ज झाली आहेत.
 • डिसेंबर २०१६मध्ये अग्नी-५ क्षेपणास्त्राचे शेवटच्या टप्प्यातील कॅनिस्टर चाचणीदरम्यान यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले होते.

अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटवले

 • बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशी मान्य करण्यास नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवले आहे.
 • कोर्टाने वारंवार सूचना देऊनही या आदेशांचे पालन न केल्याने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
 • लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यात असमर्थ असल्याचे आणि क्रिकेट संघटनांत पारदर्शकता आणण्यात अपयशी ठरल्याची कारणे ठाकूर आणि शिर्के यांना हटविण्यामागे दिली आहेत.
 • बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांसाठी नाव सुचविण्यासाठी कोर्टाने फली नरीमन आणि गोपाल सुब्रमण्यम या न्यायमित्रांची (अमायकस क्युरी) नेमणूक केली आहे.
 पार्श्वभूमी 
 • आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंगच्या धक्कादायक प्रकारानंतर, भारतीय क्रिकेटच्या साफसफाईची मोहीम हाती घेऊन सुप्रीम कोर्टाने लोढा समितीची स्थापना केली होती.
 • १८ जुलै २०१६ रोजी कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार बीसीसीआयचे पदाधिकारी नियमानुसार अपात्र ठरले होते. लोढा समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी केली होती.
 • त्यानंतर झालेल्या सुनावण्यांच्या मालिकेनंतर लोढा समितीने १४ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात याप्रकरणी आपला तिसरा अहवाल सादर केला होता.
 • लोढा समितीच्या ठाम भूमिकेनंतर सुप्रीम कोर्टानेही आपला आदेश कायम ठेवत बीसीसीआयला शिफारशी लागू करण्याचे आदेश दिले होते.

शंकर बालसुब्रह्मण्यम यांना ब्रिटनचा नाइटहूड किताब

 • भारतीय वंशाचे केम्ब्रिज विद्यापीठाचे डीएनए तज्ज्ञ व रसायनशास्त्राचे प्राध्यापक शंकर बालसुब्रह्मण्यम यांना ब्रिटनचा नाइटहूड किताब जाहीर झाला आहे.
 • ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना नाइटहूड किताब दिला जातो.
 • बालसुब्रह्मण्यम यांचे डीएनए संशोधनातील महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी डीएनए क्रमवारी लावण्याच्या नवीन तंत्राचा शोध लावला आहे.
 • त्यांनी शोधलेल्या नव्या पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर जिनोमची क्रमवारी लावली जाऊ शकते व त्यासाठी एक हजार पौंडापेक्षा कमी खर्च येतो.
 • व्यक्तिगत पातळीवर हे तंत्र वापरून आपण एखाद्या व्यक्तीला एखादा रोग कोणत्या जनुकामुळे झाला आहे, हे सांगू शकतो.
 • जीवशास्त्रातील हा क्रांतिकारी शोध असून वैद्यक क्षेत्रातही त्याचे अनेक उपयोग आहेत.
 • सर शंकर बालसुब्रह्मण्यम हे रॉयल सोसायटीचे फेलो असून ते जन्माने भारतीय असलेले ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९६६मध्ये चेन्नईत झाला व नंतर १९६७मध्ये ते ब्रिटनला गेले.
 • ब्रिटनमधील केम्ब्रिज संस्थेत ते कर्करोग संशोधन गटाचे प्रमुख आहेत व ट्रिनिटी कॉलेजचे फेलोही आहेत. केम्ब्रिज एपिजेनेटिक्स व सोलेक्सा यांच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे.
 • सध्या ते केम्ब्रिज विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात हर्शेल स्मिथ प्रोफेसर आहेत. केम्ब्रिज विद्यापीठातील रसायनशास्त्राच्या काही प्रयोगशाळांचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे.
 • न्यूक्लिइक अ‍ॅसिडमध्ये त्यांनी मोठे संशोधन केले आहे. सोलेक्सा जनुक क्रमवारी तंत्र शोधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
 • कर्करोगातील उपचारात उपयोगी पडू शकतील अशा अनेक रेणवीय क्रिया त्यांनी शोधून काढल्या असून त्यात जी क्वाड्रप्रेक्सेसचा समावेश आहे.
 • त्यांना यापूर्वी टेट्राहेड्रॉन पुरस्कार, कोर्ड-मार्गन पुरस्कार, मलार्ड ग्लॅक्सो वेलकम पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत.

किरगिझस्तानच्या मेजर जनरलपदी भारतीय वंशाची व्यक्ती

 • किरगिझस्तान सैन्याच्या मेजर जनरलपदी भारतीय वंशाचे शेख रफिक मोहम्मद यांची निवड करण्यात आली आहे.
 • किरगिझस्तानचे संरक्षण मंत्री अली मिर्झा यांनी शेख रफिक मोहम्मद यांची मेजर जनरलपदी नियुक्ती केली. ते मूळचे केरळचे आहेत.
 • केरळमधील मल्ल्याळी व्यक्तीला दुसऱ्या देशाचे सैन्याचे प्रमुखपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • रफिक यांच्याकडे किरगिझस्तानचे नागरिकत्वदेखील आहे. रफिक याआधी २००५ आणि २०१०मध्ये माजी राष्ट्रपती कुर्मानबेक सेलियेविच बेकियेव यांचे सल्लागार होते.
 • किरगिझस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या वाटचालीत रफिक मोहम्मद यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
 • रफिक यांनी किरगिझस्तानमधील कर रचना सोपी आणि सुटसुटीत करण्यावर भर दिला. त्यामुळे किरगिझस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झाली.
 • त्यांनी संयुक्त अरब अमिरात, इराण, सौदी अरेबिया आणि किरगिझस्तानसाठी काम केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा