चालू घडामोडी : २२ जून

यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी

  • ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांच्या कन्या मीरा कुमार यांना काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • भाजपप्रणीत एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
  • लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा राहिलेल्या मीरा कुमार यादेखील रामनाथ कोविंद यांच्याप्रमाणे दलित कुटुंबातून येतात.
  • मीरा कुमार यांचा जन्म १९४५ मध्ये पाटणा येथे झाला. कायद्यातून पदवी आणि इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
  • १९७३मध्ये त्यांची भारतीय विदेश सेवेत (आयएफएस) निवड झाली. त्यानंतर त्यांनी स्पेन, ब्रिटन आणि मॉरिशसमध्ये उच्चायुक्त म्हणून काम केले.
  • त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द उत्तर प्रदेशमधून सुरू केली.
  • १९८५मध्ये बिजनौर मतदारसंघातून त्या प्रथम लोकसभेत निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या पाच वेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. 
  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपदही भूषविले आहे. तर २००९ ते २०१४ या कालावधीत त्या लोकसभाध्यक्ष होत्या.
  • त्या लोकसभेच्या पहिल्या महिला व दलित समाजाच्या दुसऱ्या अध्यक्षा बनल्या. त्यांच्यापूर्वी दलित समाजातील बालयोगी यांनी हे पद भूषविले होते.

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

  • देशातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा २२ जून रोजी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आली.
  • २४ भाषांमधील लेखकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यामध्ये  मराठीतील दोन साहित्यिकांचा समावेश आहे.
  • मराठी भाषा विभागात अकादमीचा युवा पुरस्कार राधानगरी तालुक्यातील राहुल पांडुरंग कोसंबी यांच्या ‘उभं-आडवं’ या कथासंग्रहाला जाहीर झाला.
  • तर एल. एम. कडू यांच्या ‘खारीचा वाटा’ या पुस्तकाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. 
  • कोकणी भाषेत ‘मोग डॉट कॉम’ या कवितासंग्रहासाठी अमेय विश्राम नायक यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • याशिवाय विन्सी क्वाद्रूस यांच्या जादूचे पेटूल या पुस्तकाला कोकणी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • हिंदीमध्ये तारो सिदिक आणि उर्दूमध्ये रशीद अशरफ खान यांची युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या साहित्यिकांची साहित्य अकादमीच्या युवा पुरस्कारासाठी निवड केली जाते. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • युवा पुरस्कारांसह साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कारांची घोषणाही केली आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

भारतीय रिफत शाहरूखच्या उपग्रहाचे नासाकडून प्रक्षेपण

  • रिफत शाहरूख या भारतीय विद्यार्थ्याने तयार केलेल्या जगातील सगळ्यात हलक्या ६४ ग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे ‘नासा’ने २२ जून रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
  • १८ वर्षीय रिफत शाहरुख नासा आणि ‘आय डुडल लर्निंग’ने आयोजित केलेल्या ‘क्युब इन स्पेस’ या स्पर्धेत सहभागी झाला होता.
  • या स्पर्धेसाठी त्याने ठोकळ्याच्या आकाराचा ‘कलामसॅट’ नावाचा उपग्रह तयार केला होता.
  • जगातील अनेक उपग्रहांवर अभ्यास करण्यात आल्यावर रिफतने बनवलेला उपग्रह सर्वात हलका आणि लहान असल्याचे नासाने म्हटले आहे.
  • भारतीय विद्यार्थ्याने एका स्पर्धेत बनवलेला उपग्रह पहिल्यांदाच नासाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला आहे.
  • २४० मिनिटांची ही प्रक्षेपण मोहिम असून तो १२ मिनिटे अंतराळाच्या कक्षेत ‘कलामसॅट’ भ्रमण करणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रवर आरबीआयकडून निर्बंध

  • बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाढत्या अनुत्पादित कर्जांमुळे (एनपीए) रिझर्व्ह बँकेने या बँकेवर (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन) निर्बंध घातले आहेत.
  • बँकेची कामगिरी सुधारावी, बँकेच्या व्यवस्थापनात सुधारणा व्हावी, नफा वाढावा आणि बँकेच्या मत्तेचा (अॅसेट्स) दर्जा सुधारावा, या उद्देशाने हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
  • मात्र, या निर्बंधांमुळे बँकेच्या नियमित कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शनमधील निर्बंधांनुसार बँकांना रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नव्या शाखा सुरू करता येत नाहीत. बँकांच्या उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येत नाही.
  • तसेच बँकांच्या कामकाजातील काही गोष्टींवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण राहते. बँकांना मान्यतेशिवाय मोठ्या रकमेची कर्ज (कॉपोरेट लेंडिंग) देण्यावरही निर्बंध असतात.
  • केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी व रोडमॅप निश्चित करण्यासाठी दोन वर्ष ज्ञानसंगम परिषदेचे आयोजन केले होते.
  • पुण्यातील पहिल्या ज्ञानसंगम परिषदेनंतर बँकांची कामगिरी सुधारण्यासाठी इंद्रधनुष्य या सात कलमी कार्यक्रमाची निश्चिती करण्यात आली.
  • बँकांना या निकषांनुसार आपली आर्थिक कामगिरी सुधारण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
  • या आढाव्यानंतरही ज्या बँकांची कामगिरी सुधारलेली नाही, अशा बँकांवर रिझर्व्ह बँकेने बंधने घालण्यास सुरुवात केली आहे.
  • आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आलेली बँक ऑफ महाराष्ट्र आयडीबीआय, देना, युको आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियानंतरची पाचवी राष्ट्रीय बँक आहे.

संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येबद्दलच्या अंदाजाचा अहवाल प्रसिद्ध

  • संयुक्त राष्ट्राच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, जगामधील एकूण लोकसंख्या २०५०पर्यंत ९.८ अब्ज इतकी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या जगाची लोकसंख्या सध्या ७.६ अब्ज इतकी आहे.
  • संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विषयक विभागाने २०१७मधील लोकसंख्येची समीक्षा करुन अहवाल तयार केला आहे.
  • संयुक्त राष्ट्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेला लोकसंख्येबद्दलच्या अंदाजाचा हा २५वा अहवाल आहे. याआधीचा अहवाल २०१५मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.
 या अहवालामधील महत्त्वपूर्ण अंदाज 
  • सध्या चीनची लोकसंख्या १४१ कोटी इतकी आहे. तर भारताची लोकसंख्या १३४ कोटी इतकी आहे.
  • जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १९ टक्के लोक चीनमध्ये, तर १८ टक्के लोक भारतात राहतात.
  • २०२४पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल.
  • यापूर्वीच्या २४व्या अहवालामध्ये भारत २०२२ मध्येच चीनला मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
  • २०३०मध्ये भारताची लोकसंख्या १५० कोटींवर जाऊन पोहोचेल. २०५०पर्यंत भारताची लोकसंख्या १६६ कोटी इतकी प्रचंड असेल.
  • भारताच्या लोकसंख्या वाढीचे प्रमाण २०५० नंतर कमी होईल, अशी शक्यतादेखील संयुक्त राष्ट्राने अहवालातून व्यक्त केली आहे.
  • २०५०पर्यंत नायजेरिया हा अमेरिकेस मागे टाकून जगातील तिसरा सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल.
  • दरवर्षी जागतिक लोकसंख्येत सुमारे ८.३ कोटींची भर पडत आहे.
  • प्रजोत्पादनाचा घटणारा दर विचारात घेऊनही २०३०पर्यंत जगाची लोकसंख्या ८.६ अब्ज; २०५०पर्यंत ९.८ अब्ज; तर २१००पर्यंत ११.२ अब्ज इतकी असेल.
  • नायजेरियामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे. याशिवाय २०५०पर्यंत आफ्रिकेमधील २६ देशांमधील लोकसंख्या वाढीचा वेग किमान दुप्पट झाला असेल.
  • सध्या जगातील वृद्ध नागरिकांची संख्या ९६.२ कोटी इतकी आहे. २०५०पर्यंत ती २.१ अब्ज; तर २१०० मध्ये ती ३.१ अब्ज इतकी असेल.

टेनिसपटू बोरिस बेकर दिवाळखोर घोषित

  • सहा ग्रँडस्लॅम जेतेपदांची कमाई करणारा ख्यातनाम माजी टेनिसपटू बोरिस बेकरला दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • एका बँकेचे कर्ज थकवल्याने ब्रिटनमधील न्यायालयाने बेकरला दिवाळखोर म्हणून जाहीर केले आहे.
  • मूळचा जर्मनीचा पण सध्या ब्रिटनमधील लंडन येथे राहणाऱ्या बोरिस बेकरने आर्बटनोट लँथम अँड कंपनी या बँकेचे कर्ज २०१५पासून थकवले होते.
  • ४९ वर्षीय बेकरचा जन्म जर्मनीत झाला होता. त्यानंतर बेकर लंडनमध्ये वास्तव्यास आला होता. तो जर्मनीकडून टेनिस खेळत होता.
  • नोवाक जोकोविचला बेकरने प्रशिक्षण दिले असून सध्या तो समालोचक म्हणूनही काम करतो.
  • बोरिस बेकरने १९८५, १९८६ आणि १९८९ साली विम्बल्डनमध्ये जेतेपद पटकावले होते.
  • याशिवाय १९९१ आणि १९९६मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, १९८९मध्ये यूएस ओपनमध्येही त्याने बाजी मारली होती.
  • १९८८ आणि १९८९मध्ये त्याने डेव्हिस कपमध्ये पश्चिम जर्मनीला विजेतेपद पटकावून दिले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा