चालू घडामोडी : ३ जानेवारी

सावित्रीबाई फुलेंची १८६वी जयंती

  • स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरण यांच्यासाठी केलेल्या कार्याला मानवंदना म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या १८६व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डूडल तयार केले आहे. 
  • ३ जानेवारी १८३१ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. महिलांचे शिक्षण आणि त्यांचे सबलीकरण यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
  • सामाजिक कार्यकर्त्या आणि कवी म्हणून सावित्रीबाई फुले सुपरिचित आहेत. आपल्या साहित्यातून सावित्रीबाईंनी नेहमीच समानतेचा पुरस्कार केला.
  • देशातील पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक सुधारणेच्या चळवळीत मोलाची भूमिका बजावली.
  • पती ज्योतीराव फुले यांना खंबीरपणे साथ देत आणि प्रसंगी समाजाच्या विरोधात जात सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे सामाजिक कार्य अखंडितपणे सुरू ठेवले.
  • महिलांचे शिक्षण, त्यांचे सबलीकरण, त्यांचे हक्क यांच्यासाठी सावित्रीबाई आयुष्यभर झटत होत्या.
  • पुण्यातील भिडे वाड्यात १८४८मध्ये ज्योतीराव फुलेंच्या मदतीने सावित्रीबाईंनी फुले यांनी देशातील महिलांसाठीची पहिली शाळा सुरु केली.
  • त्यामुळेच २०१४मध्ये पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यात आले.

एलपीजीच्या ऑनलाइन पेमेंटवर पाच रूपयांची सूट

  • कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आता घरगुती सिलिंडरच्या (एलपीजी) ऑनलाइन पेमेंटवर पाच रूपयांची सूट जाहीर केली आहे.
  • यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाइन व्यवहारांसाठीही ग्राहकांना ०.७५ टक्के सूट देण्याचे आदेश सरकारने तेल कंपन्यांना दिले होते.
  • तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडर ऑनलाईन बुक करण्याची आणि नेट बॅंकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • सिलेंडर बुक केल्यानंतर पैसे भरताना येणाऱ्या बिलातून पाच रुपये वजा करण्यात येणार आहेत.

न्यायमित्रांच्या समितीतून एफ एस नरिमन यांची माघार

  • बीसीसीआयच्या प्रशासकांच्या नावांची सूचना करण्यासाठी नियुक्त केलेल्या न्यायमित्रांच्या समितीतून (अमायकस क्युरी) कायदेतज्ज्ञ एफ एस नरिमन यांनी माघार घेतली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने एफ एस नरीमन यांच्या स्थानी सीनिअर वकील अनिल दिवाण यांची नियुक्ती केली आहे.
  • न्यायालयाने दोन्ही वकिलांना दोन आठवड्यांत संभाव्य प्रशासकांची नावे सुचविण्यास सांगितले आहे.
  • सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे पालन न केल्याने बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना कोर्टाने पदावरून हटविले होते.
  • त्यानंतर त्याजागी नवे पदाधिकारी निवडण्यासाठी कोर्टाने एफ एस नरिमन आणि गोपाल सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली होती.

भारतीय टेनिसपटू सोमदेव देववर्मन निवृत्त

  • भारतीय टेनिसपटू सोमदेव देववर्मनने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली आहे.
  • त्याची कारकीर्द २०१२मध्ये खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे संपुष्टात आली. या दुखापतीचा प्रभाव त्याच्या कारकिर्दीवर झाला आणि अखेर त्याने टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
  • सोमदेवने २००८ मध्ये डेव्हिस कपमध्ये कारकिर्दीचा प्रारंभ केला. त्यानंतर एकेरीमध्ये त्याने सातत्याने भारताचे नेतृत्व केले.
  • भारताच्या डेव्हिस कप संघाचा नियमित सदस्य असलेला सोमदेव १४ सामने खेळला आणि २०१०मध्ये भारताला विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • सोमदेवने एटीपी टूर-२००९ चेन्नई ओपनमध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश मिळवताना अंतिम फेरी गाठली होती. त्याचप्रमाणे २०११मध्ये दक्षिण आफ्रिका ओपनमध्ये अंतिम फेरी गाठली होती. 
  • सोमदेवने ग्वांग्झूमध्ये २०१०च्या आशियाई स्पर्धेत एकेरी व दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. २०११मध्ये तो अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
  • सोमदेव जवळजवळ एक दशक भारताचा एकेरीतील सर्वोत्तम खेळाडू मानला जात होता.

डेव्हिड वॉर्नरचे कसोटीच्या पहिल्याच सत्रात शतक

  • ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने पहिल्याच सत्रात ७८ चेंडूत शतक करण्याचा पराक्रम केला आहे.
  • अशी किमया करणारा डेव्हिड वॉर्नर हा जगातील पाचवा तर ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे.
  • वॉर्नरने ७८ चेंडूंमध्ये शतकी खेळी करताना सिडनी मैदानावर सर्वांत वेगवान शतक झळकावण्याचा नवा विक्रम नोंदवला. 
  • यापूर्वीचा विक्रमही वॉर्नरच्याच नावावर होता. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ८२ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
  • वॉर्नरच्या आधी १९३०साली ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांनी, तर १९७६साली पाकिस्तानच्या माजिद खान याने अशी शतकी कामगिरी केली होती.
  • ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ट्रंपर याने १९०२साली मॅनचेस्टरमधील सामन्यात उपहारापूर्वी १०३ धावा केल्या होत्या.
  • त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच चार्ली मैकार्टनी यांनी १९२६साली लिड्समध्ये ११२ धावा केल्या होत्या.
  • डॉन ब्रॅडमन यांनी १९३०साली उपहारापूर्वी १०५ धावा करून विक्रम केला होता. त्याचसोबत याच डावात त्यांनी ३३४ धावांच्या विक्रमाची नोंद केली होती.

पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता

  • पाकिस्तानच्या सिनेटने हिंदू विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता मिळण्याच्या विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे आता हिंदू पद्धतीने विवाह केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी करता येणार आहे.
  • तसेच, घटस्फोट घेता येणे आणि  पतीच्या निधनानंतर महिलांना पुनर्विवाहाची परवानगी मिळाली आहे. हिंदू पद्धतीनुसार विवाह केलेल्या जोडप्यांना नोंदणीचे अधीकृत प्रमाणपत्र मिळणार आहे.
  • या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास शिक्षा होऊ शकते अशी तरतूदही या कायद्यामध्ये आहे.
  • ज्या जोडप्यांचे घटस्फोट झाले आहेत त्यांना देखील लग्न करण्याची परवानगी मिळाली आहे. या कायद्यानुसार हिंदू विधवांना पुनर्विवाहाची मान्यता मिळाली आहे.
  • सप्टेंबरमध्ये हिंदू विवाह कायदा २०१६चा मसुदा नॅशनल असेम्ब्लीमध्ये ठेवण्यात आला होते. त्याला मान्यता मिळाल्यानंतर हे विधेयक वरिष्ठ सभागृहात म्हणजे सिनेटमध्ये आले.
  • पाकिस्तानमध्ये १.६ टक्के हिंदू राहतात. तरीदेखील पाकिस्तानच्या निर्मितीपासून आतापर्यंत तेथे हिंदू विवाहांना कायदेशीर मान्यता नव्हती.
  • त्यामुळे हिंदूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या जाचातून पाकिस्तानमधील हिंदूंची सुटका होणार आहे.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार टायरस वाँग यांचे निधन

  • ज्येष्ठ व्यंगचित्रकार टायरस वाँग यांचे वयाच्या १०६व्या वर्षी निधन झाले. ‘बॅम्बी’हे त्यांनी काढलेले कार्टून व्यक्तिचित्र चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले. 
  • वाँग यांनी वॉल्ट डिस्ने स्टुडिओ, वॉर्नर ब्रदर्स, हॉलमार्क या ख्यातनाम कार्टून कंपन्यांसाठी काम केले.
  • मूळचे चीनचे असलेले वाँग वडिलांबरोबर अमेरिकेत स्थायिक झाले आणि त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून नाव कमावले.
  • वाँग यांनी वॉल्ट डिस्ने स्टुडिओसाठी १९३८ ते १९४१ दरम्यान तीन वर्षांसाठी काम केले.

तुर्कस्तानातील हल्ल्याला आयसिस जबाबदार

  • तुर्कस्तानात नववर्षदिनी नाइट क्लबवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली आहे.
  • या हल्ल्यात ३९ जण ठार झाले. त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. यातील हल्लेखोर अजून बेपत्ता असून तो आयसिसशी संबंधित आहे.
  • जूनमध्ये इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावर हल्ले करणाऱ्या गटातीलच एकाने हा हल्ला केला असावा अशी शक्यता आहे.
  • इस्लामिक स्टेट आणि कुर्दिश दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे २०१६ हे वर्ष तुर्कीसाठी रक्तरंजित ठरले.  दुर्दैवाने २०१७ची सुरुवातही रक्तरंजितच झाली.

ट्विटरच्या चीनमधील प्रमुख केथी चेन यांचा राजीनामा

  • सोशल नेटवर्किंगमध्ये जगातील आघाडीच्या संकेतस्थळांपैकी एक असलेल्या ट्विटरच्या चीनमधील प्रमुख केथी चेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 
  • त्यांच्याकडे आठ महिन्यांपूर्वीच ट्विटरच्या चीनमधील व्यवसायाची सूत्रे सोपविण्यात आली होती.
  • चीनमध्ये २००९ पासून ट्विटर ब्लॉक करण्यात आलेले आहे, मात्र व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क्सवरून (VPN) येथे ट्विटर वापरले जाते. 
  • चीनमध्ये देशांतर्गत सोशल मीडियाला जास्त वाव देण्यात आला असून, त्यामध्ये ‘सिना वेईबो’ हे मायक्रोब्लॉगिंगचे संकेतस्थळ आणि ‘वीचॅट’ हे मेसेजिंग अॅप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा