चालू घडामोडी : ८ जानेवारी

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

  • आपल्या अभियनाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे ६ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
  • त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला होता. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते.
  • घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयक्षेत्रात पर्दापण केले होते. आक्रोश हा त्यांचा पहिला गाजलेला चित्रपट होता.
  • त्यांनी  आपल्या कारकिर्दीत ३००हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी ‘मजमा’' या खासगी नाट्यमंडळाची स्थापना केली.
  • ओम पुरी यांनी हॉलीवूडमध्येही आपली छाप सोडली होती. अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.
  • नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७३बॅचचे ते विद्यार्थी होते. अभिनयाबरोबरच त्यांचा भारदस्त आवाज व संवादफेक कौशल्य अप्रतिम होते.
  • अलीकडेच आलेल्या ‘द जंगल बुक’ या चित्रपटातील ‘बघीरा’ला ओम पुरी यांनी आवाज दिला होता.
  • आस्था, हेराफेरी, अर्धसत्य, चक्रव्यूह, चायना गेट, घायल यासारख्या विविध चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.
  • गेल्या काही वर्षांत, सामाजिक घडामोडींबाबत त्यांनी काही मतेही मांडली होती. त्यातली बरीच मते वादग्रस्त ठरली होती.
  • केंद्र सरकारने त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना १९९०मध्ये पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते.
  • आरोहण आणि अर्धसत्य चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
  • ब्रिटिश सिनेसृष्टीतील कसदार कामगिरीबद्दल त्यांना मानद 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' ही पदवीही प्रदान करण्यात आली होती.
  • ब्रिटिश विनोदी चित्रपट 'ईस्ट इज ईस्ट'मधील भूमिकेसाठी त्यांना बाफ्टा पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

हिंदू कॉलेजच्या स्थापनेला दोनशे वर्षे पूर्ण

  • कोलकाता येथील हिंदू कॉलेजच्या स्थापनेला २० जानेवारी २०१७ रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत.
  • यानिमित्त २० जानेवारीला होणाऱ्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमासाठी एक हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
  • ६ डिसेंबरला २०१६पासून संगीत रजनी कार्यक्रमाद्वारे हिंदू कॉलेजच्या स्थापनेच्या २०० वर्षाच्यानिमित्त वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली होती.
  • आत्तापर्यंत या कॉलेजचे तीनदा नाव बदलण्यात आले आहे. मूळ हिंदू कॉलेजची स्थापना ही १८१७मध्ये झाली.
  • त्यानंतर १८५५मध्ये त्याचे नाव प्रेसेडन्सी कॉलेज असे झाले तर २०१०मध्ये त्याचे नामकरण प्रेसेडन्सी विद्यापीठ असे झाले.
  • आपल्या २०० वर्षांच्या इतिहासात या विद्यापीठात काळानुसार अनेक शैक्षणिक बदलही झाले असून आता येथे २१व्या शतकानुसार शिक्षण देण्यात येत आहे.

जवानांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढविण्याची शिफारस

  • लष्करातील जवानांचे (शिपाई) निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढविण्याची शिफारस संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. 
  • संरक्षण मंत्रालयाने निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त केली होती.
  • या समितीने आपला अहवाल मागील महिन्यात सादर केला असून, त्यात जवानांच्या निवृत्तीचे वय २ वर्षांनी वाढविण्याची शिफारस केली आहे.
  • ही शिफारस मंजूर झाल्यास लष्कराच्या खर्चात हजारो कोटी रुपयांची बचत होणार आहे.
  • तसेच लष्कारासमोर असलेली प्रशिक्षित मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्यादेखील दूर होण्यास मदत होणार आहे.
  • लष्कराची सज्जता वाढविण्यासाठी अनुपयोगी खर्चात कपात करून उपलब्ध स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देण्यात यावा, असे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • सध्या लष्करात शिपाई म्हणून भरती होणारे जवान पदोन्नती न मिळाल्यास १७ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतात.
  • सुमारे ८० टक्के शिपाई म्हणूनच निवृत्त होतात. दरवर्षी लष्करातून ६० हजार शिपाई निवृत्त होतात.

प्रवासी कौशल्य विकास योजना

  • बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या १४व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवासी कौशल्य विकास योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली.
  • परदेशात रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीयांना या योजनेचा लाभ होणार आहे.
  • अकुशल भारतीय कामगारांचा कौशल्यविकास व्हावा आणि ते जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी तयार व्हावेत हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत परदेशात ठराविक क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे प्रशिक्षित आणि प्रमाणित करण्यात येईल.
  • राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने पररष्ट्र मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षकांच्या साह्याने ही योजना राबविण्यात येणार आहे.

सानिया मिर्झाला ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद

  • भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय महिला दुहेरी स्पर्धेत अमेरिकेच्या बेथानी मॅट्टेक-सॅंड्‌स हिच्या साथीने विजेतेपद मिळविले.
  • प्रथम स्थानावरील मिर्झा-सँड्स या जोडीने ६-२, ६-३ अशा फरकाने दुसऱ्या मानांकित एकाटेरिना माकारोव्हा आणि एलिना व्हेसनिना या रशियन जोडीवर विजय मिळवला.
  • परंतु या यशामुळे बेथानीने जागतिक क्रमवारीत सानियाला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळविला. बेथानी यापूर्वी पाचव्या स्थानी होती.
  • सानिया १३ एप्रिल २०१५पासून प्रथम स्थानी होती. तिने ९२ आठवडे हा क्रमांक राखला. यात ३१ आठवडे ती मार्टिना हिंगीससह संयुक्तरित्या प्रथम स्थानी होती.
  • गेल्या वर्षी तिने हिंगीसच्या साथीने ब्रिस्बेन, सिडनी आणि ऑस्ट्रेलियन ओपन या तीन स्पर्धा जिंकल्या होत्या.

भारत आणि पोर्तुगाल दरम्यान सहा सामंजस्य करार

  • पोर्तुगालचे पंतप्रधान ऍन्टोनिया कोस्टा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि पोर्तुगाल दरम्यान सहा सामंजस्य करार झाले.
  • यामध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबद्दलच्या कराराचादेखील समावेश असून ऍन्टोनिया कोस्टा आणि पंतप्रधान मोदींनी या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
  • ऍन्टोनिया कोस्टा सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, त्यांनी पंतप्रधान मोदींना ख्रिस्तीयानो रोनाल्डोची जर्सी भेट म्हणून दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा