चालू घडामोडी : ११ जानेवारी

पराग हवालदार यांना टेक्निकल ऑस्कर पुरस्कार

  • मूळ भारतीय असलेल्या अमेरिकेतील पराग हवालदार यांना तंत्रज्ञानातील ऑस्कर पुरस्कार (टेक्निकल ऑस्कर) जाहीर झाला आहे.
  • अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड सायन्सेसतर्फे हा पुरस्कार दिला जातो. ११ फेब्रुवारी २०१७ रोजी हवालदार यांना तो प्रदान केला जाईल.
  • हवालदार हे खरगपूर आयआयटीतून कॉम्प्युटर इंजिनीअर झाले आहेत. १९९१मध्ये पदवीधर झाल्यानंतर काही तरी नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी ते अमेरिकेत गेले.
  • युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅनिफोर्नियामधील उच्चशिक्षणानंतर ते सोनी पिक्चर्स इमेजवर्क्समध्ये रुजू झाले.
  • चित्रपट आणि खेळांमध्ये द्विमिती आणि त्रिमिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
  • त्यांचे हे तंत्रज्ञान ‘ॲलिस इन वंडरलॅण्ड’, ‘मॉन्स्टर हाऊस’ आणि ‘स्पायडरमॅन’ मालिकेतील चित्रपटांमध्ये वापरण्यात आले आहे.
  • मल्टिमीडिया तंत्रज्ञानामध्ये त्यांचा हातखंडा असून ते सी++, सी, मॅटलॅब, जावा, पायथॉन, लिस्प आणि सीलोज या संगणकीय भाषांचेही तज्ज्ञ मानले जातात.
  • या त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांना टेक्निकल ऑस्करचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी राखीव आसने

  • भारताची राष्ट्रीय हवाई कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी राखीव आसने ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • येत्या १८ जानेवारीपासून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
  • जगात पहिल्यांदाच अशाप्रकारे कोणत्याही विमानांमध्ये महिलांसाठी आसने राखीव ठेवण्यात येणार आहेत.
  • एकट्याने विमान प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमध्ये सूर्यनमस्कारांचा विश्वविक्रम

  • छत्तीसगडमध्ये योगगुरु बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
  • या शिबिरात १ लाख लोकांनी सूर्यनमस्कार आणि योगा करून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला. या विश्वविक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
  • याआधी बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत २०१६मध्ये ५० हजार लोकांनी योग सादर करून विश्वविक्रम केला होता.
  • या योग शिबिराला छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह आणि योगगुरु रामदेव बाबा यांची उपस्थिती होती.

तंबाखूबाबत डब्लूएचओचा अहवाल प्रसिद्ध

  • तंबाखू आणि त्याचे दुष्परिणाम यासंबंधी जागतिक आरोग्य संघटना आणि युएस कॅंसर इंस्टिट्यूटने एक अहवाल सादर केला आहे.
  • हा एकूण ६६८ पानांचा अहवाल असून या अहवालाचे परीक्षण ७० तज्ज्ञांनी केले आहे. धुम्रपान आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजारांच्या उपाययोजनांवर अब्जावधी डॉलर्स खर्च होतात असे या अहवालात म्हटले आहे.
 अहवालातील ठळक मुद्दे: 
  • जर धुम्रपानाला वेळीच आळा घातला नाही तर येत्या काळात तंबाखूजन्य पदार्थांमुळे लोकांचे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण हे कित्येक पटीने वाढेल.
  • सध्या तंबाखू आणि धुम्रपानामुळे दरवर्षी जगभरात ६० लाख लोक मृत्यूमुखी पडतात. जर धुम्रपानाचे प्रमाण आणि विक्रीवर वेळीच आळा घातला नाही तर २०३०पर्यंत दरवर्षी ८० लाखांच्या वर लोक मृत्यूमुखी पडतील.
  • येत्या काळात हे प्रमाण वाढतच जाईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनी दिला आहे.
  • कर्करोग किंवा तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या आजारांच्या खर्चावर जगभरात १ ट्रिलियन डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक खर्च केला जातो.
  • म्हणजेच या उत्पादनांमधून जो महसूल मिळतो त्यापेक्षा अधिक रक्कम ही आजारांच्या उपचारांवर खर्च केली जाते.
  • जगाचा विचार केला तर तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांचे सर्वाधिक सेवन हे अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये होते. ८० टक्के धुम्रपान करणारे लोक हे याच देशाचे सदस्य.

कर्नाटकमध्ये बायोडिझेलवर धावणाऱ्या बस

  • वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी कर्नाटक परिवहन अर्थात केएसआरटीसीने (कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) १०० टक्के बायोडिझेलवर धावणाऱ्या २५ लक्झरी बस खरेदी केल्या आहेत.
  • बायोडिझेलवर धावणाऱ्या या प्रत्येक मल्टिअॅक्सल बसची किंमत ९१.१० लाख इतकी आहे.
  • या सर्व बसला बायोडिझेल किट बसवण्यात आलेले आहे. या बसमुळे हवेत होणारे प्रदूषण टळणार आहे.
  • या बसची खास रचना करण्यात आली आहे. यातून आरामदायक प्रवास करता येईल अशा पद्धतीने याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे.
  • प्रत्येक सीट्सच्या रांगेत लॅपटॉप आणि मोबाइल चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.
  • त्याचबरोबर प्रवाशांच्या मनोरंजनासाठी रांगेत फोल्डेड एलसीडी मॉनिटर आणि डिव्हिडी प्लेअरची सुविधा देण्यात आली आहे.
  • आणीबाणीच्या वेळी बसमध्ये अलार्म वाजेल. उल्लेखनीय म्हणजे या बसला ६ इमरजन्सी दरवाजे आहेत.
  • बायोडिझेलवरील या बसमुळे प्रतिवर्षी सुमारे ८६.६ लाखांची बचत होणार असल्याचा दावा केएसआरटीसीने केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा