चालू घडामोडी : १८ जानेवारी

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर

  • जळगाव जिल्ह्यातील निशा पाटीलला शौर्यासाठी, साहसासाठी २०१६चा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • निशाने १४ जानेवारी २०१५रोजी एका घराला लागलेल्या आगीतून पूर्वी देशमुख या सहा महिन्यांच्या बालिकेचे प्राण वाचविले होते.
  • या कार्यसाठी निशाला हा पुरस्कार जाहीर झाला असून, सध्या ती भडगाव येथील आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यलयात बारावीत शिकत आहे.
  • निशाबरोबरच असे शौर्य दाखविणाऱ्या २५ बालकांना (१२ मुली व १३ मुले) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये चौघांचा मरणोत्तर सन्मान होत आहे.
  • २३ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल, तसेच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही ही मुले सहभागी होतील.
  • यावर्षीचा सर्वोच्च भारत सन्मान अरुणाचल प्रदेशाच्या तार पेजू हिला मरणोत्तर जाहीर झाला आहे.
  • आठ वर्षांच्या तेजूने नदीत बुडणाऱ्या आपल्या दोन मैत्रिणींचे प्राण धाडसाने वाचविले होते. मात्र तिला आपला जीव गमावावा लागला.
  • यशिवाय गीता चोप्रा पुरस्कार १८ वर्षांच्या तेजस्विता प्रधान व १७ वर्षांच्या सिवानी गोंड यांना जाहीर झाला आहे.
  • त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला देहव्यापार रॅकेट उध्वस्त करण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिस व स्वयंसेवी संस्थांना मोलाची मदत केली होती.
  • संजय चोप्रा पुरस्कार उत्तराखंडचा १५ वर्षांय सुमीत माम्गेन याला मरणोत्तर जाहीर झाला.
  • देशातील शूरवीर मुलांना व मुलींना प्रोत्साहन म्हणून १९५७पासून भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात.
  • पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून, या बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते.

कपिल देव यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश

  • भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • भारतीय संघासाठी १९८३साली विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांना भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते.
  • यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारे पहिले फलंदाज सुनील गावस्कर यांचाही सन्मान करण्यात आला.
  • गावस्कर यांचा याआधीच ११ जुलै २०१३साली क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

काळविट शिकार प्रकरणात सलमान खान दोषमुक्त

  • अभिनेता सलमान खानला १८ वर्षांपासून सुरु असलेल्या बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणातून जोधपूर सत्र न्यायालयाने दोषमुक्त ठरविले आहे.
  • शस्त्र परवान्याची मुदत संपली असतानाही बंदूक बाळगणे आणि त्याचा वापर करणे यासाठी सलमानविरोधात १९९८मध्ये वन विभागाने गुन्हा दाखल केला होता.
  • हा आरोप सिद्ध झाल्यास सलमानला सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता होती.
  • राजस्थानमधील कणकली या गावात काळविटाची शिकार केल्याचा सलमान खानवर मुख्य आरोप होता. याप्रकरणी त्याला यापूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
  • ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी १ ऑक्टोबर १९९८ रोजी ही घटना घडली होती.

प्रियंका चोप्राला पुन्हा पीपल्स चॉईस अवॉर्ड

  • भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्राने २०१७च्या अमेरिकेच्या ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’मध्ये लोकप्रिय ड्रामॅटिक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे.
  • अमेरिकन टीव्ही मालिका ‘क्वॉन्टिको’तील भूमिकेसाठी प्रियांकाला पीपल्स चॉईस अवॉर्डने गौरवण्यात आले आहे.
  • 'क्वॉन्टिको'ची कथा अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेवर आधारित आहे. या मालिकेत तिने प्रशिक्षणार्थी एफबीआय एंजटची भूमिका साकारली आहे.
  • प्रियंका चोप्राला २०१६मध्येही ‘क्वान्टिको’मधील भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ने गौरविण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा