चालू घडामोडी : १६ फेब्रुवारी

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी पलानीस्वामी

  • तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी अण्णाद्रमुकचे नवनिर्वाचित नेते ई के पलानीस्वामी यांना १६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
  • यामुळे गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये सुरू असलेला राजकीय गोंधळ तूर्तास संपुष्टात आला असला तरीही, येत्या १५ दिवसांत पलानीस्वामी यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
  • १२४ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र पलानीस्वामी यांनी दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते.
  • यावेळी पलानीस्वामी यांच्यासह त्यांच्या ३१ सदस्यीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही राज्यपालांनी शपथ दिली.
  • पलानीस्वामी हे व्ही शशिकला यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे आगामी काळात अण्णाद्रमुकची सूत्रे ही शशिकला यांच्याच हातात राहणार आहेत.

आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत १४३व्या क्रमांकावर

  • अमेरिकेच्या ‘द हेरिटेज फाऊंडेशन’कडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारत आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत जगात १४३व्या क्रमांकावर असल्याचे समोर आहे.
  • मागील वर्षभरात आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पिछेहाट झाली असून, याबाबतीत पाकिस्ताननेदेखील भारताला मागे टाकले आहे.
  • द हेरिटेज फाऊंडेशनने जाहीर केलेल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या निर्देशांकानुसार पाकिस्तानसह दक्षिण आशियातील अनेक देश भारतापेक्षा पुढे आहेत.
  • या संस्थेने भारताला ५२.६ गुण दिले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत भारताला ३.१ गुण कमी मिळाले आहेत. मागील वर्षात भारत आर्थिक स्वातंत्र्याच्या यादीत १२३व्या क्रमांकावर होता.
  • आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत हाँगकाँग, सिंगापूर आणि न्यूझीलंड या देशांनी अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे.
  • भारताचे शेजारी देश भूटान (१०७), श्रीलंका (११२), नेपाळ (१२५), बांगलादेश (१२८), पाकिस्तान (१४१) या यादीत भारतापेक्षा पुढे आहेत.
  • चीनने गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.४ अधिक गुणांची कमाई करत १११वे स्थान पटकावले आहे. या यादीत अमेरिका ७५.१ गुणांसह १७व्या स्थानी आहे.
 या यादीतील ठळक मुद्दे 
  • भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश पूर्णपणे मुक्त नसलेल्या गटात करण्यात आला आहे. याला बाजारपेठ अनुकूल धोरणात नसलेले सातत्य कारणीभूत ठरले आहे.
  • भारताच्या बाजारपेठेत होणाऱ्या सुधारणांमुळे होणारी प्रगती असमान आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्था गेल्या ५ वर्षांपासून ७ टक्क्यांनी वाढते आहे. मात्र आर्थिक वाढीचा फायदा सर्वांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात अपयश आले आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या माध्यमातून सरकार गरजेपेक्षा जास्त अस्तित्व बाजारपेठेत दाखवून देत आहे.
  • तसेच निर्बंध आणि कठोर नियामक वातावरण यामुळे स्वयंउद्योजकतेसोबत खासगी क्षेत्राच्या वाढीला प्रतिकूल वातावरण निर्माण झाले आहे.
  • भारत हा जागतिक व्यापारातील महत्त्वाचा घटक. मात्र, भ्रष्टाचार, अविकसित पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक संपत्तीचे कमकुवत व्यवस्थापन याचा सर्व विकासावर परिणाम.

सरकारी अधिकाऱ्यांनी भेटवस्तू स्वीकारणे बेकायदा

  • सरकारी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी आपल्या उत्पन्नाचा भाग म्हणून भेटवस्तू दाखवणे यापुढे बेकायदा ठरणार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • जयललिता यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
  • एखाद्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळाली आहे असे दाखवून सरकारी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आपली भ्रष्ट संपत्ती लपवू शकतात. त्यामुळे हा निर्णय महत्वपूर्ण आहे.
  • भारतीय दंडविधानाच्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यामधील १६१ ते १६५अ या कलमांनुसार नागरी सेवेतील अधिकाऱ्यांनी भेटवस्तू स्वीकारणे बेकायदा आहे.
  • एखाद्या ज्ञात व्यक्तीने लोकसेवेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू दिली तर त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे.
  • परंतु केवळ नोंद ठेवल्यामुळे किंवा भेटवस्तूवरील कर भरल्यामुळे अशा प्रकारच्या भेटवस्तू घेणे हे कायदेशीर होत नाही असे न्यायालयाने सांगितले.

उसेन बोल्टला चौथ्यांदा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार

  • वेगाचा बादशाह उसेन बोल्टने विक्रमी चौथ्यांदा लॉरेस जागतिक पुरस्कार सोहळ्यात वर्षातील ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कार पटकावला.
  • क्रीडा विश्वातील ऑस्कर मानला जाणारा हा पुरस्कार याआधी बोल्टने २००९, २०१० आणि २०१३साली मिळवला आहे.
  • यासह बोल्टने रॉजर फेडरर, सेरेना विलियम्स आणि केली स्लेटर या दिग्गज खेळाडूंच्या विक्रमाशी बरोबरी करत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लेब्रोन जेम्स या स्टार खेळाडूंना मागे टाकले आहे.
  • यावेळी जिमनॅस्ट सिमोन बाइल्स हिने महिला गटात वर्षातील ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कार मिळवला. तर अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकल फेल्प्सला ‘वर्षातील सर्वोत्तम पुनरागमन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा